मुंबई : मी विधानसभेचीच निवडणूक लढविणार आहे. ती देखील माझ्या नागपूर मतदारसंघातूनच लढवेन, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. 16 नोव्हेंबर) गुरुवारी केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आगामी लोकसभा निवडणूक पुणे किंवा मुंबईतून लढणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. देशातील जनतेने तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनाच संधी देण्याचे ठरविले असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा – राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल, म्हणाले – “कोरोनात मृत्यूचे तांडव सुरू असताना…”
दीपावली निमित्त फडणवीस यांनी आज आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी बोलताना राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे खंदे बॅटसमन आहेत. भक्कम विकेटकिपींग करायला मी आहेच. त्यामुळे सरकारमध्ये कोणतेही टेंशन नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी यांनाच विराजमान करण्याचा निश्चय केला आहे. त्यात आता कोणताही बदल होणार नसल्याचे फडणवीस यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले. तसेच पुढील 10 वर्षांत तुमचा राजकीय प्रवास कसा असेल असे पत्रकारांनी विचारले असता, याबाबत बोलताना ते म्हणाले की, राजकारणात पुढे काय होते हे भाकित करता येत नाही. मात्र दहा वर्षांनी देखील मी भाजपसाठीच काम करत असेन आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी निश्चितच पार पाडेन असे त्यांच्याकडून यावेळी विश्वासाने सांगण्यात आले.
महापालिका निवडणुका कधी होणार? याबाबत विचारले असता, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आम्हालाही निवडणुका हव्याच आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमधील आमच्या यशाचे प्रतिबिंब निश्चितच या निवडणुकीत पडेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. दिवाळीनिमित्त शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली यांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, राजकारण आणि कौटुंबिक नाती ही वेगवेगळी असतात. या भेटीमुळे हेच स्पष्ट झाले. अशी कौटुंबिक भेट झाल्याचा आपल्याला आनंदच झाला. राजकारणात कटुता नकोच. महाराष्ट्रातही ती नाही. फक्त चार- पाच व्यक्ती जर सोडल्या आणि त्यांची वक्तव्ये जर सोडली तर महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही कटुता उरेल असे मला वाटत नसल्याचेही फडणवीस म्हणाले. दिवाळी निमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा दिल्याचेही त्यांनी सांगितले.