संभाजीराजेंची ठरवून कोंडी करण्यात आली, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

राज्यसभेच्या निवडणुकीतून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेकडून (Shiv Sena) राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार दिल्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis)  यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.

संभाजीराजेंची ठरवून कोंडी करण्यात आली

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पवार साहेबांनी आधी संभाजीराजेंना पाठिंब्याची घोषणा केली नंतर घुमजाव केलं. त्यामुळे संभाजीराजेंची ठरवून कोंडी करण्यात आल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही आणि त्यामागची कारणं नेमकी काय आहेत, हेदेखील स्पष्ट केलं आहे. मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, कोणतही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल आपण दोघांनी तिथं जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं आणि संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगायचं मग. असं म्हणत उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं.

शरद पवारांनी संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला होता. तसंच शिल्लक राहिलेली मतं त्यांना दिली जातील अशी घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, शिवसेनेकडून राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि आता पवारांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही

संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही. राज्यसभेवर जाण्यासाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी देऊ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. परंतु शिवसैनिकाला उमेदवारी दिली आहे. राज्यसभेवरील जागेचा विषय आमच्यासाठी आता संपला असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला नाही – संभाजीराजे