सडलेला कांदा शोधणारे आधुनिक यंत्र, देवळ्यातील शेतकर्‍यांनी चाळीत सोडले सेन्सरचे युनिट

device for detecting cursed onions
सडलेला कांदा शोधणारे आधुनिक यंत्र, देवळ्यातील शेतकर्‍यांनी चाळीत सोडले सेन्सरचे युनिट

चाळीत साठवलेला कांदा कालांतराने खराब होतो आणि शेतकर्‍यांना मोठे नुकसान सोसावे लागते, मात्र नाशिकच्या देवळा तालुक्यातील सावकी गावचे सुरेश पाटील आणि प्रकाश पाटील या शेतकर्‍यांनी त्यावर उपाय शोधला आहे. सडका कांदा शोधण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान कांदा चाळीत बसविले आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल. हा पहिलाच प्रयोग असून परिसरातील शेतकरी हा प्रयोग पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.

उन्हाळी कांदा चाळीत साठवण्याची लगबग सध्या सुरू आहे. चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात पाठवतात, मात्र यादरम्यान चाळीतील एखादा कांदा सडला, तर इतर कांद्यांना त्यापासून धोका निर्माण होतो. पर्यायाने संपूर्ण कांदा चाळ खराब होते. शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. देवळ्यातील पाटील कुटुंबीयांनी त्यांच्या 60 फूट चाळीत सुमारे 400 ते 450 क्विंटल कांदा साठवला आहे. यामध्ये या सेन्सरचे 10 युनिट बसविले आहे. प्रत्येक कप्प्यात पाईपमधून हे युनिट खाली सोडले आहे. गोदाम इनोव्हेशन या कंपनीच्या सहकार्याने ही यंत्रणा बसवली आहे.

यासाठी सध्या सव्वा ते दीड लाख रुपये खर्च आल्याचे या शेतकर्‍यांनी सांगितले. तरी सेन्सरद्वारे सडका कांदा शोधून कांद्याचे संभाव्य नुकसान टाळता येईल, असा दावा या शेतकर्‍यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यात सात ते आठ ठिकाणी ही सेन्सर यंत्रणा बसविण्यात आली आहे. कांद्यातील आद्रतेचे प्रमाण तसेच अमोनिया आणि इतर वायूंमुळे चाळीतील कांदा कोणत्या भागात खराब होतो ते सेन्सरद्वारे दर्शवले जाते. त्यामुळे सडका कांदा ताबडतोब बाहेर काढून उर्वरित कांदा खराब होण्यापासून वाचवता येतो. यासाठी कृषी विभाग आणि ‘आत्मा’ या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. शासनाने या सेन्सर यंत्रणेला सबसिडी दिल्यास ही यंत्रणा शेतकर्‍यांना वरदान ठरेल यात शंका नाही.

असा ओळखतात खराब कांदा

राज्यात सर्वाधिक कांदा चाळ नाशिक जिल्ह्यातच आहेत. सुरेश पाटील व प्रकाश पाटील यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे कांद्याच्या आद्रतेबाबत प्रमाण तसेच अमोनिया आणि इतर वायूंमुळे चाळीतील कांदा कोणत्या भागात खराब होतो याचा अंदाज सेन्सरद्वारे येतो. यामुळे खराब कांदा ताबडतोब लक्षात येऊन तो बाहेर काढला जाईल आणि बाकीचा कांदा खराब होण्यापासून वाचवता येईल.

कांदा चाळीत 10 बाय 5 फुटांवर बसवले जाते. प्रत्येक कप्प्यात पाईपमधून खाली सोडले जातात. गोदाम इनोव्हेशन या कंपनीच्या सहकार्याने त्यांनी ही यंत्रणा बसवली आहे. यासाठी सध्या सव्वा ते दीड लाख रुपये खर्च लागत असला तरी त्याचे महत्त्व मोठे आहे. प्रयोगशील व उपक्रमशील शेती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे.
-प्रकाश पाटील, शेतकरी, सावकी