पुण्यात भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; गाड्यांचा झाला चक्काचूर

पुण्यातील दहिवडी घाट येथे पिकअप जीप आणि ट्रॅक्टर या दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बाळुमामा पालखी तळावरून येत असताना भाविकांच्या गाडीला हा अपघात झाला आहे.

Devotees' car met with a terrible accident in Pune

बाळूमामा यांच्या पालखी तळावरून दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप जीप आणि ट्रॅक्टर या दोन वाहनांमध्ये हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात ट्रॅक्टरची चाके तुटून पडली तर पिकअप जीप देखील पलटी होऊन या दोन्ही वाहनांचे मोठे नुकशान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु आठ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिरूर तालुक्यातील करंदी येथे बाळुमामाची पालखी मुक्कामी आहे. या पालखीचे बाळुमामाच्या तळावर जाऊन दर्शन घेण्यासाठी सोलापूर येथील करमाळा तालुक्यातील भाविक याठिकाणी आले होते. पालखी तळावरील पंगत आणि धार्मिक विधींचा कार्यक्रम झाल्यानंतर हे भाविक पुन्हा आपल्या पिकअप जीप गाडीतून कामाल्यांकडे आपल्या घरी निघाले.

दरम्यान, घरी जात असताना न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील दहिवडी घाटात या पिकअप जीपचा आणि समोरून येणाऱ्या ट्रक्टरमध्ये जोरदार धडक झाली. या दोन्ही वाहनांमध्ये झालेली धडक इतकी भीषण होती की, या घटनेत पिकअप जीप पलटी झाली तर ट्रॅक्टरची चाके तुटून पडली. तसेच अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान देखील झाले. ट्रॅक्टर चालकाने चुकीच्या दिशेने आपले वाहन आणल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज खेडमध्ये; कोणावर साधणार निशाणा?

या अपघातात राजश्री अण्णा चोपडे (वय ४०), श्रुती दुर्गडे (वय ३०), शोभा परमेश्वर महानवर (वय ५५), मिना वाघमोडे (वय ४५), सावित्री आशिष पाटील (वय ४०), रुपाली अण्णा केसकर (वय ३०), कविता युवराज बोराटे (वय ३५) आणि अंजली महारनोर (वय ७) हे सर्वजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिक्रापूर येथील रुग्णालयात उपचार चालू असून हे सर्वजण करमाळा जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी असल्याचे सूत्रांनी संगितले आहे.