घरताज्या घडामोडीकोकणात गणेश चतुर्थीला गावी जाणाऱ्यांचे प्रमाण घटणार

कोकणात गणेश चतुर्थीला गावी जाणाऱ्यांचे प्रमाण घटणार

Subscribe

गणेश चतुर्थी करता आवर्जून गावी जाणाऱ्या कोकणी माणसाला यंदा कोरोनाच्या संकटामुळे गावाला मुकावे लागत आहे. कोरोनामुळे आधीच उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न असताना, त्यातच सरकारी नियमांमुळे गावी जाण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गणपतीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाली असून यंदा गावाऐवजी आपल्या बाप्पाला गावातील मूळ घराऐवजी मुंबईतील घरी विराजमान करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे एक नवीन प्रथा पडणार असून पुढे बाप्पाच्या मूर्तीचे पूजन मुंबईतील घरीच केले जाणार असल्याने, एरव्ही गणपतीच्या निमित्ताने गावाकडे फिरकणारा चाकरमानी पुढे गावाकडे पूर्णपणे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

कोरोनाचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर पडले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन सरकारने करून सार्वजनिक गणेश मूर्तींची उंची कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातच दरवर्षी गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांनाही मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे. सरकारच्या नियमानुसार, गावी जाणाऱ्यांना ई-पासची नोंदणी करून गावी जाता येणार असून गावी गेल्यानंतर १४ दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण अर्थात क्वारंटाईन करण्याचा नियम घातला आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमन्यांची मोठी गैरसोय झाली आहे. आधीच लॉकडाऊनचा कालावधी सुरू आहे. तीन महिन्यांनंतर काही मंडळी कामाला जायला लागली. त्यामुळे १४ दिवसांचे क्वारंटाईन राहण्यासाठी चाकरमान्यांना एक महिन्यांची सुट्टी घेऊनच गावी जावे लागणार आहे. त्यातच प्रत्येकाला एक महिन्याची सुट्टी घेऊनच गावी जावे लागणार आहे. तरीही काही चाकरमानी एखादे रिकामे घर किंवा बंगला शोधून क्वारंटाईनची व्यवस्था करत आहेत. काही झाले तरी गणपतीला जायचेच असा निर्धार चाकरमानी करत आहेत.

- Advertisement -

यंदा कोरोनामुळे गावी जाण्याची इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थिती आणि त्यातच सरकारी नियम यामुळे गावी जाणाऱ्यासमोर मोठे आव्हान आहे. परंतु ज्यांचे गावी कुणीच नाही आणि ज्यांना गणपती पुजनाकरिता गावी जायचे आहे, त्यांची तर त्याहूनही वाट लागली आहे. गणेश मूर्तीचे पूजन तर करायचेच आहे. पण गावी जाणे अशक्य आहे, अशा काही कुटुंबानी यंदा गावातील घराऐवजी मुंबईतील घरीच गणपतीचे पूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा अनेक कुटुंब गावी न जाता मुंबईतच आपल्या घरात बाप्पांना विराजमान करणार आहे. मालवण, कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ आदी तालुक्यातील बहुतांशी चाकरमान्यांना गावा ऐवजी मुंबईतील घरात बाप्पा आणावा लागणार आहे. कोरोनामुळे चाकरमान्यांना हा निर्णय घ्यावा लागला तर मुंबईतील घरीच गणेश मूर्तीचे पूजन करावे लागणार आहे. त्यामुळे ही प्रथाच पडणार असून भविष्यात गणेश चतुर्थी करता गावी येणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल, अशीही भीती ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -