घरमहाराष्ट्रसंजय पांडे करणार परमबीर सिंह यांची चौकशी, १०० कोटीचे प्रकरण

संजय पांडे करणार परमबीर सिंह यांची चौकशी, १०० कोटीचे प्रकरण

Subscribe
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटी वसुलीचा आरोप करणाऱ्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची नवे पोलीस महासंचालक संजय पांडे हे चौकशी करणार आहेत. मुंबई पोलीस दलाकडून याप्रकरणी एक अहवाल गृहविभागाला सादर करण्यात आला होता, त्यानुसार आता चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काही दिवसांपूर्वी एक अहवाल गृह विभागाला सादर केला होता. वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची नेमणूक, नेमणूकीनंतरची जबाबदारी, सचिन वाझे यांचे थेट परमबीर सिंह यांना रिपोर्टिंग यासारख्या मुद्द्यावर ही चौकशी होईल असे कळते.
राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी संजय पांडे यांची शुक्रवारी रात्री उशीरा राज्याचे पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार असून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा पदभार सुद्धा असणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या संचालक पदाचा कार्यभार सुद्धा त्यांच्याकडे असणार आहे.
देशमुखांवर १०० कोटींचा आरोप
स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांच्या समावेशामुळे परमबीर सिंह यांनाही बदलीचा फटका सहन करावा लागला.  त्यांच्या बदलीनंतर त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केला. अनिल देशमुख यांची निवृत्ती न्यायधिशांमार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारने आदेश दिले. एखाद्या व्यक्तीची निवृत्ती न्यायधिशांमार्फत चौकशी करण्यात आल्यानंतर ती व्यक्ती कोणत्याही पदावर राहत नाही. त्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचे प्रकरण समोर आले. एखाद्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास अकार्यकारी पद देण्यास सूचना देण्यात येतात. मात्र, अशा सूचना दिल्या असताना देखील सचिन वाझेंना सेवेत घेऊन कार्यकारी पद दिल्यामुळे अनेकांनी विरोध केला होता. तरी देखील वाझे यांना सीआययूच्या प्रमुखपद देण्यात आले. तसेच सीआययूचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे अवैध धंद्यांबाबतचे छापे इतर कारवाई वाझे पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याचे अहवालात म्हटले. या अहवालानंतर आता गृहविभागाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले असून संजय पांडे हे परमबीर सिंह यांची चौकशी करणार आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -