बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मीक कराड हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र अद्यापही धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताना दिसत नाही. अशातच महंत नामदेव शास्त्री यांनी भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मृत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याने नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. (Dhananjay Deshmukh anger over Mahant Namdev Shastri statement)
माध्यमांशी संवाद साधताना धनंजय देशमुख म्हणाले की, संतोष देशमुख यांनी ज्या आरोपीला चापट मारली, त्याच्यावर 22 गुन्हे आहेत. एक चापट मारली म्हणून त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली. एका चापटेच्या बदल्यात त्यांनी आम्हाला 10 चापट मारल्या असत्या तरी चाललं असतं. पण आता तुम्ही म्हणता एक चापट मारली म्हणून त्यांची मानसिकता काय झाली असेल, मग आज आमची मानसिकता काय झाली असेल हे समाज आणि सगळे लोकं बघत आहेत. त्याचेही तुम्ही उत्तर दिले पाहिजे, असे आवाहन धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांना दिले.
हेही वाचा – Dhananjay Munde : भगवान गड मुंडेंच्या पाठीशी, नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर मनसेचे टीकास्त्र
अशी मानसिकता असेल तर दिवसा मुदडे पडतील
दरम्यान, धनंजय देशमुख म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरोपींना फाशी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता आम्ही त्याचीच वाट बघत आहोत आणि तीच आमची मानसिकता आहे. परंतु एका चापटीच्या बदल्यात हत्या करायची मानसिकता तुमची असेल, तर तुम्ही समाजाचे देणे लागत नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. पण अशी मानसिकता जर कोणी केली तर दिवसा मुदडे पडतील, अशी शक्यता धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा जातीय संघर्ष नसून 18 पगड जातीचे लोक न्याय मागण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे, हा जातीय संघर्ष नसून ही विकृती आहे, असेही धनंजय देशमुख यांनी म्हटले.
नामदेव शास्त्री काय म्हणाले?
दरम्यान, आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे गुन्हेगार आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे. परंतु ज्या लोकांनी हे प्रकरण केले, हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली, हे मीडिया का दाखवत नाही. त्यांना मारहाण का झाली, हेही दखल घेण्याजोगे आहे. मारहाण झाली तो त्यांच्या गावाचा मुद्दा आहे, असे म्हणत नामदेव शास्त्री यांनी भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचे म्हटले.