(Dhananjay Deshmukh murder case) मुंबई : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. घटनेच्या दोन महिन्यांनंतरही त्याचा शोध लागू न शकल्याने पोलिसांनी कृष्णा आंधळेला वॉन्टेड घोषित केले आहे. इतकेच नाही तर, त्याला शोधणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा देखील पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी, शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे उदाहरण देत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. (Many questions from Sushma Andhare to Mahayuti)
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे यांचा सहभाग असल्याचे समोर आले. या हत्येमध्ये अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मीक कराड असल्याचाही आरोप आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीला एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यानंतर सीआयडी तसेच न्यायालयीन चौकशीच्या माध्यमातून या हत्येचा तपास वेगाने सुरू आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्यासह सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मकोकाही लावण्यात आला आहे. तसेच वाल्मीक कराड याच्यावरही मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र अद्यापही या हत्येप्रकरणी कृष्णा आंधळे हा फरार आहे.
संजय राठोड यांचा राजीनामा मागणाऱ्यांनी संजय राठोड यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले. त्यांनी नैतिकतेच्या गप्पा काय माराव्यात. नैतिकता हा शब्द गुळगुळीत होत चाललाय..l @ShivSenaUBT_
@ShivsenaUBTCommhttps://t.co/cc0OsiDCcr pic.twitter.com/GB0PDtgG4h— SushmaTai Andhare (@andharesushama) February 17, 2025
याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी जी स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली त्यात दोन मोबाइल सापडले होते. त्या मोबाइलचा डेटा अद्याप का रिकव्हर झाला नाही? झाला असेल तर तो रीलिज का केला नाही? विष्णू चाटेचा महत्त्वाचा मोबाइल अद्याप का सापडला नाही? वाल्मीक कराडच्या आवाजाचे सॅम्पल घेतले होते, त्याचा रिपोर्ट काय आहे? आरोपींच्या कोठड्या पुन्हा पुन्हा वाढविण्याचे नेमके कारण काय? अशी सरबत्ती त्यांनी केली आहे.
तर, फरार संतोष आंधळेच्या बाबतीत त्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचा संदर्भ दिला आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचे अपहरण झाल्याचे वृत्त 10 फेब्रुवारी रोजी पसरले होते. पण नंतर तो पुण्यातील लोहगाव विमानतळावरुन चार्टर्ड प्लेनने बँकॉकला गेला होता. मात्र, नंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या मार्फत त्याचे विमान अंदमान-निकोबार येथून माघारी वळवण्यात आले. असे असताना कृष्णा आंधळेचा शोध कसा लागत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा घ्यायलाच हवा, राऊतांची मागणी