पोलीस भरती प्रक्रियेत अर्जासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ द्या, धनंजय मुंडेंची मागणी

Maharashtra Corona Update: Dhananjay Munde gives information Two months financial help to 35 lakh beneficiaries

मुंबई – महाराष्ट्र पोलीस खाते अंतर्गत पोलीस शिपाई, चालक अशा सुमारे 18000 पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अखेरची तारीख देण्यात आलेली आहे. मात्र अर्ज करण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्वर डाऊन होणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत असून रात्र रात्र जागून उमेदवार आपले अर्ज भरत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भरतीसाठी पात्र असलेले ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहू शकतात अशी भीतीही व्यक्त केली जात असून या सर्व पात्र उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज करता यावा यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यातील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात अशी मागणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विट करत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ द्यावी; उमेदवारांची मागणी

धनंजय मुंडे यांनी या संदर्भात एक ट्विट केले असून, याआधी देखील पोलीस भरतीचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कोणत्या वर्षीचे सादर करावे यावरून उमेदवारांमध्ये बराच संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेला. तो संभ्रम दूर झाल्यानंतर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे किंवा तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या एजन्सीच्या चुकीमुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठीची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्वर डाऊन असणे या बाबी सतत समोर येत असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

अजूनही अनेक उमेदवार वेगवेगळ्या इंटरनेट कॅफेमध्ये, क्लासेसमध्ये किंवा मोबाईल वरून तासनतास बसून भरती प्रक्रियेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी प्रयत्न करत असून भरती प्रक्रियेची अर्ज करण्याची मुदत संपत चालल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. अनेक उमेदवारांनी देखील अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी विविध माध्यमांमधून केली आहे. यालाच अनुसरून धनंजय मुंडे यांनी भरती प्रक्रियेची मुदत 30 नोव्हेंबरपासून पुढे पंधरा दिवसांसाठी वाढविण्यात यावी, तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ग्रामीण भागातील लाखो उमेदवार अनेक दिवसांपासून पोलीस भरती साठी पूर्वतयारी करत असतात, अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे एकही पात्र उमेदवार स्पर्धेतून बाहेर पडून त्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी संबंधित यंत्रणेने घेणे गरजेचे असुन, धनंजय मुंडे यांच्या मागणीचा तातडीने सकारात्मक विचार व्हावा, अशा भावना अनेक उमेदवारांनी व्यक्त केल्या आहेत.