इंदूमिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे ४८ टक्के काम पूर्ण, धनंजय मुंडेनी दिल्या सूचना

स्मारकाच्या कामांना गती देवून ते विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

Dhananjay Munde takes strategic decisions regarding various demands of theKhatik society

इंदू मिल येथे साकारत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे ४८ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मंगळवारी आढावा बैठकीत दिले. स्मारकाचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्मारकाचे प्रवेशद्वार इमारत,व्याख्यान वर्ग,ग्रंथालय, प्रेक्षागृह,स्मारक इमारत,बेसमेंट वाहनतळ,स्मारक इमारत आणि पुतळा वगळता प्रकल्पाचे अंदाजित काम ४८ टक्के पुर्ण झाले आहे. उर्वरीत कामे गतीने पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही सविस्तर माहिती बैठकीत देण्यात आली.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमिल येथील स्मारकाच्या कामाचा आढावा दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित बैठकीत घेतला. स्मारकाच्या कामाला गती देवून विहित कालावधीत स्मारकाचे काम पूर्ण व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंडे यांनी यावेळी दिले. तसेच पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासंदर्भातील गठीत समितीचे लवकरच पुनर्गठन करण्यात येईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

मुंडे यांनी यावेळी कोरोना स्थितीमुळे प्रकल्पाच्या कामांचा मूळ कालावधी वाढला आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामांना गती देवून ते विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदूमिल येथील स्मारक हे जागतिक दर्जाचे असणार आहे. या स्मारकाकडे संपूर्ण जगाचेच लक्ष असणार आहे. हे लक्षात घेवून काम दर्जेदार व्हावे यासाठी संबंधितांनी लक्ष द्यावे. तसेच कामाच्या सद्यस्थितीची माहिती दर्शनी भागात लावावी, अशा सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी दिल्या. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास यांनी कामांची सद्यस्थिती संदर्भात माहिती दिली. बैठकीला विभागाचे सचिव श्याम तागडे तसेच अधिकारी उपस्थित होते.

क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक

पुण्यातील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारक उभारणीच्या कामात भूसंपादन व अन्य अडचणी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मदतीने स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून दूर करण्यात येतील व या स्मारकाच्या उभारणीच्या कामास गती देण्यात येईल असेही मुंडे यांनी सांगितले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकास गती देणार

मुंबईतील घाटकोपर येथील चिरागनगर भागात एस आर ए व म्हाडाच्या संयुक्त विद्यमाने राज्य सरकारच्या माध्यमातुन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचे काम सुरू आहे. या कामाचा काही दिवसातच एक स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल तसेच या कामास गती देण्यात येईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारला विनंती केलेली असून, येणाऱ्या अधिवेशन काळात याबाबतचा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठविण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली.