बीड – जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडून, महायुतीतील सहकारी पक्षाकडून आणि विरोधकांनीही निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी बीड हत्याकांडातील मास्टरमाईंड वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक व्यवहार, त्यांचे ऑफस ऑफ प्रॉफिट प्रकरण आणि कृषीमंत्री काळातील 275 कोटींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. त्यातच आता धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत म्हटले की, याचे वासे फिरले आहेत. त्याच्या टोळभैरवांनी परळी, बीडमध्ये उच्छाद मांडला आहे. कोणीही त्याचा राजीनामा मागण्यापेक्षा आता त्यानेच राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सारंगी महाजन यांनी केली आहे.
मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे मामा दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. अंजली दमानियांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सारंगी महाजन म्हणाल्या की,‘धनंजय मुंडे यांनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी आटापिटा लावला आहे. धनंजय मुंडे यांनी जनतेचा रोष पाहून राजीनामा द्यायला हवा.’
धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राला खरं रुप दाखवलं
सारंगी महाजन म्हणाल्या की, “माझ्या 36 गुंठे शेत जमिनीचा घोटाळा झाला आहे. त्याबद्दल अंजली दमानिया यांना माहिती आहे. अंजली दमानिया यांना ‘बदनामियाँ’ म्हणून धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राला स्वतःचं खरं रूप दाखवलं आहे. खरं तर त्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा. त्याने पाच वर्षे जनतेची सेवा करावी. त्याच्या टोळभैरवाने त्याच्या मंत्रीपदाचा, पालकमंत्रीपदाचा वापर करुन जी घाण करुन ठेवली आहे ती आधी त्याने साफ करावी. स्वतःची इमेज चांगली करावी. त्यानंतर स्वच्छ इमेज आणि स्वच्छ हेतूनी जनतेसमोर यावं, अशी मागणी सारंगी महाजन यांनी यांनी केली.
सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडेंच्या लोकांवर गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या की, “त्याचे लोक हे तिथल्या मुलींना मारतात, त्यांचा विनयभंग करतात. असे जे व्यवहार तिथे होतात, ते रोखण्याचे काम याने पदावरुन खाली उतरुन केलं पाहिजे.”
सारंगी महाजनांकडून धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख
धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत सारंगी महाजन म्हणाल्या की, “हा मार तोऱ्यात सांगतो की, मला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला किंवा अजित दादांनी राजीनामा मागितला, तर मी बघेन. मात्र त्यांनी तुला मंत्रिपदावर बसवलं आहे. आज जेव्हा जनतेचा रोष आहे. जनतेचा रोष बघून धनंजय मुंडेने राजीनामा द्याययला हवा.” असे सारंगी महाजन म्हणाल्या.
सारंगी महाजन यांच्या 36 गुंठे शेत जमीनीचा वाद आहे. त्या म्हणाल्या की, माझ्या 36 गुंठ्यांच्या जागेमध्ये घोटाळा झालेला आहे. धनंजय मुंडेला माझी 36 गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होतं? तो समोर आला असता तर आपसात व्यवहार मिटला असता. पण त्याने मला कोर्ट कचेरीत घेतलं आहे. मात्र यातून तोच बदनाम झाला आहे’, असंही सारंगी महाजन म्हणाल्या.
संतोष देशमुख हत्याकांडाचे प्रकरण समोर आल्यानंतर सारंगी महाजन यांनी दुसऱ्यांदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याआधी त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुुटंबियांची मस्साजोग येथे जाऊन भेट घेतली होती, त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांनाही तुरुंगात टाका अशी मागणी केली होती.
हेही वाचा : CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर, धनंजय मुंडे राहणार गैरहजर