धनंजय मुंडेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट?, राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Dhananjay Munde
धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. धनंजय मुंडे रात्री साडेबाराच्या सुमारास सागर निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी देंवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस आणि मुंडे यांच्या भेटीचे कारण आणि तपशील कळू शकलेला नाही.

सुमारे अर्धा तास चर्चा –

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी रात्री साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचे स्पष्टीकरण –

यावर धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेल्याचा दाव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. नव्या सरकारमध्ये हे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. फडणवीस आणि धनंजय मुंडे हे भाजप युवा मोर्चामध्ये एकत्र होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी सागर बंगल्यावर गेले असावेत. त्यामध्ये दुसरे काही कारण असणे गरजेचे नाही. धनंजय मुंडे हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहे. विधानसभेत प्रमुख तोफ म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे बघतो. धनंजय मुंडे मुळातूनच भाजपकडून आले आहेत. त्यामुळे त्यांचे संबंध असणे आणि त्यांनी भेट घेणे स्वाभाविक आहे, असे महेश तपासे म्हणाले.