मुंबई : आमदार संदीप क्षीरसागर आणि इतर कोणाला ज्या गोष्टी माहीत आहेत, त्यावर मला असं वाटतं की आरोपी आणि संदीप शिरसागर यांचे संबंध आहेत, असा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर केला आहे. (Dhananjay Munde On Sandeep shirsagar beed crime case dhananjay munde news in marathi)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, मात्र अजूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये, त्याचा शोध सुरू असून त्याला पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. अशात संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सुरुवातीपासूनच भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून आता मंत्री धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करत प्रत्युत्तर दिले आहे.
मंत्रालायात आज (28 जानेवारी) राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले. “संदीप क्षीरसागर आणि इतर कोणाला ज्या गोष्टी माहीत आहेत, त्यावर मला असं वाटतं की आरोपी आणि संदीप क्षीरसागर यांचे संबंध आहेत. कारण हे संबंध असल्याशिवाय त्यांना ही माहिती कशी मिळू शकते. त्या कृष्णा आंधळेला काय झालं आहे, याची पोलिसांना माहिती नाही. आम्हाला माहिती नाही. पण त्यांना माहिती आहे, याचाच अर्थ असा होतो की, आरोपी आणि यांचा कुठेतरी संबंध आहे. त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या आपल्याला ती बातमी मिळते”, असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले होते संदीप क्षीरसागर?
“संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे आता सापडेल असं मला वाटत नाही. त्या भागातील एक इतिहास आहे, जर तो सापडायचा असता तर पोलिसांना सापडला असता त्यामुळे मला वाटत नाही तो आता सापडेल. मी पहिल्यापासून या प्रकरणात सीडीआर तपासण्याची मागणी करत आहे. काही ना काही सीसीटीव्ही फुटेज मिळत आहे, आणि साखळी जुळत आहे. माध्यमांनी जे दाखवलं त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला ते पण पुढे येत आहेत. आणखी बरेच जण पुढे येणार आहेत. आमदार सुरेश धस आणि मी यावर पोलीस अधीक्षकांना बोलणार आहोत, वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर देखील लोक रस्त्यावर आहेत याचा अर्थ लोकांमध्ये रोष आहे. प्रशासनाला मोकळा श्वास दिला पाहिजे, त्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, आणि सरकारने तो घेतला पाहिजे”, असे म्हणत संदीप क्षीरसागर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
हेही वाचा – Sandeep Kshirsagar : अजितदादांची भेट घेऊन येताच क्षीरसागर यांचा मोठा दावा; म्हणाले, कृष्णा आंधळे हा…