मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे सांभाळत आहेत. त्यासाठीच मुंडे बाहेर फिरत आहेत, असा आरोप मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. तसेच, धनंजय मुंडे यांच्यावर 302 कलम लावण्यात यावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली आहे. आता जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांना मंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेत जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. पण, मुंडेंनी टाळलेला. परंतु, पत्रकार परिषदेतून जाताना पुन्हा पत्रकारांनी जरांगे-पाटलांच्या आरोपांबद्दल विचारल्यावर धनंजय मुंडे थांबले. एकच संताप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
हेही वाचा : ‘वर्षा बंगल्याच्या परिसरात रेड्याची शिंगे पुरली,’ राऊतांच्या दाव्यावर भुजबळांना हसू आवरेना, हात जोडला अन्…
रागात धनंजय मुंडे म्हणाले, “काय चाललंय, काय चाललंय… एकाला जरांगे-पाटील यांची प्रतिष्ठा कमी करायची आहे, एकाला वाढवायची आहे… मला नेमके कळेना… हे फक्त बातमीच्या प्रतिष्ठेसाठी चालले आहे. माझ्यासारखा माणूस मेला, तरी तुम्हाला फरक पडत नाही. मी कुणाची हत्या करण्याचा विषय सोडून द्या.”
“संतोष देशमुख प्रकरणाची पूर्ण चौकशी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालय करत आहे. माझ्यासारखा संवैधानिक पदावर बसलेला माणूस याबाबत बोलला नाही पाहिजे. बाकी मोठे-मोठे माणसे बोलले, तरी काय फरक पडत नाही. मला संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय पाहिजे, राजकारण नको आहे,” असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
“मी माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड दौऱ्यास मी जाणार नाही,” असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
जरांगे-पाटील काय म्हणाले होते?
“संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना धनंजय मुंडे सांभाळत आहेत. त्यासाठीच ते बाहेर फिरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे धनंजय मुंडेंवरच 302 कलम लावावा. पापी लोकांची पाठराखण करण्याचे काम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून पुरावे नष्ट करण्याचे काम केले आहे. धनंजय मुंडे बाहेर आरोपी बाहेर सांभाळण्यासाठी फिरत आहेत,” असं जरांगे-पाटील यांनी म्हटलं होते.
हेही वाचा : दमानियांचे मुंडेंवर गंभीर आरोप; संदीप क्षीरसागर म्हणाले, मी पहिल्यापासून…