नैतिक जबाबदारी समजून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा – प्रवीण दरेकर

धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर हे प्रकरण आता तापू लागले आहे.

pravin darekar and dhananjay munde
प्रवीण दरेकर आणि धनंजय मुंडे 

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी पक्षामध्येच दोन भूमिका घेतल्या जात आहेत. परंतु, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्यास त्यांनी नैतिक जबाबदारी समजून आपला राजीनामा दिला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी घेतली. मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे वक्तव्य केले आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंडेंबाबत कोणताही निर्णय न झाल्याचे म्हटले.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा. जर या प्रकरणात त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले, तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश मिळू शकतो. यापूर्वीही शिवसेना भाजप युतीच्या काळात अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी तत्कालीन मंत्री शशिकांत सुतार, बबनराव घोलप यांचा राजीनामा घेतले होते. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या मंत्र्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, असे दरेकर म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर हे प्रकरण आता तापू लागले आहे. मुंडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीबद्दल गुरुवारी शरद पवार म्हणाले, काल मुंडेंनी मला भेटून या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्या संबंधातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्थानकात त्यांच्याबद्दलची एक तक्रार आली. त्यासंबंधीची चौकशीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे प्रकरण असे होईल आणि व्यक्तिगत आरोप होतील असा अंदाज त्यांना असावा म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात भूमिका आधीच मांडली होती. त्यावर उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त करून घेतला आहे.