सांगली : मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी तब्बल 17 दिवस उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांचे उपोषण सुटले जरी असले तरी आता धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. यामध्ये चक्क सत्तेतील आमदार गोपीचंद पडळकरांनीच सरकारला इशारा दिला असून, त्याचे पडसाद राज्यातील राजकारणावर उमटण्याची चिन्हे आहेत.(Dhangar movement like Jat can survive in Maharashtra too House envy from Padalkars)
सत्तेत येण्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही प्रत्यक्षात तसे झाले नाही. तर आता काही दिवसापूर्वीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याने भंडारा उधळला होता. यादरम्यानच आता महायुतीतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत धनगर आरक्षणावरुन इशारा दिला आहे.
राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा पेटला असतानाच आता धनगर आरक्षणावरूनही रान पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. धनगर आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात सुरू असलेली याचिका तसेच महायुती सरकारने समाजासाठी केलेल्या योजनांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली आहे.
मराठा आंदोलकानंतर आता धनगर समाज आक्रमक
आमदार गोपीचंद पडळकर हे सत्ताधारी भाजप पक्षातील असून, ते त्यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे ओळखले जातात. यादरम्यान राज्यात सध्या विविध समाजाचा आरक्षणाचा मुद्दा पुढे येत असताना दुसरीकडे मात्र, सरकारकडून कोणती पाऊल उचलली जातात याबाबत सांगता येणे शक्य नाही. त्यामुळे आता मराठा आंदोलकांपाठोपाठ धनगर समाजातील नेतेही आरक्षणाच्या मागणीवरून सरकार जाब विचारत आहेत.
हेही वाचा : आमदार अपात्रता प्रकरणात वेळकाढूपणा का करताय? सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना सुनावले
काय आहे मुख्यमंत्र्याना लिहलेल्या पत्रात?
पडळकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ज्या पद्धतीने औरंगाबाद व उस्मानाबादचे नामांतर करण्यासाठी तत्काळ व ठोस पाऊले उचलण्यात आली त्या पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरासाठीतातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे. आम्ही सर्व धनगर बांधव आमचे प्रश्न कायदा व संसदीय मार्गाने मार्गी लावण्यास प्रयत्नशील आहोत. परंतु होणारी दिरंगाई व सतत अवहेलना यामुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो, याबाबतची काळजी व दक्षता घेऊन वरील मुद्यांबाबतची बैठक त्वरित आयोजित करावी. अन्यथा महाराष्ट्रात सुद्धा जाट आंदोलनासारखे धनगर आंदोलन उभा राहू शकते.
विखे पाटलांवर उधळला होता भंडारा
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच धनगर समाज आरक्षण कृती समितीने 10 दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर सोलापुरात भंडारा उधळला होता. धनगर आरक्षणाचा प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित असल्यानं धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांनी भंडारा उधळला होता.