जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात सभा घेण्यात येत आहेत. तर 1 डिसेंबरपासून राज्यातील अनेक भागांत पुन्हा एकदा साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना दुसरीकडे आता धनगर समाजाने देखील एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. धनगर समाजाकडून यासाठी राज्यभरात आंदोलन आणि उपोषण करण्यात येत आहे. राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धनगर आंदोलक आंदोलन करत आहेत. याच मागणीसाठी आज (ता. 21 नोव्हेंबर) जालना जिल्ह्यातील धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला होता. यावेळी आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागल्याची माहिती समोर आली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास धनगर आंदोलकांकडून मोर्चा काढण्यात आला होता. ज्यानंतर या आंदोलनातील आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Dhangar protestors became aggressive for demand of reservation, vandalized collector’s office)
हेही वाचा – राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – “आमच्या मागे कोण आहे? त्याला…”
धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा गांधी चमन येथून सुरू होऊन शनि मंदिर, उड्डाणपुल, नुतन वसाहत, अंबड चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले आणि नेत्यांचे भाषण झाले. भाषणानंतर काही लोकांनी जिल्हाधिकारी यांनी खाली येऊन निवेदन घेण्याची मागणी केली. पण, जिल्हाधिकारी खाली न आल्याने काही तरुण आक्रमक झाल्यामुळे तोडफोडीची घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे.
आक्रमक झालेल्या तरुणांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड करायला सुरुवात केली. पाहता पाहता मोठा जमाव जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. धनगर समाजाचे कार्यकर्ते हातात पिवळे झेंडे घेऊन आले होते. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावर अडवण्यात आले. त्यामुळे संतप्त कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून आत शिरले, असाही आरोप आता करण्यात येत आहे. तर, आंदोलकांनी आत शिरताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या. खुर्च्या उचलून फेकल्या. वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे एकच तणाव निर्माण झाला होता. मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले होते.
या घटनेमुळे जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. ज्यामुळे यानंतर या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. मोर्चा असल्याने पोलिसांकडून आधीपासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. मात्र, आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच जालना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.