घरमहाराष्ट्रSanjay Raut : अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याबाबत मोदी खोटे बोलले काय? राऊतांचा...

Sanjay Raut : अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याबाबत मोदी खोटे बोलले काय? राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

Subscribe

अजित पवार यांच्या 70 हजार कोंटींच्या सिंचन घोटाळ्याबाबत मोदी खोटे बोलले काय? असे लिहित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील 'रोखठोक' सदरांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमिनीच्या एका प्रकरणात अटक केली, पण देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांना भाजपाचे अभय आहे. महाराष्ट्रात तर अजित पवार यांना ‘क्लीन चिट’ मिळाली. म्हणजे 70 हजार कोंटींच्या सिंचन घोटाळ्याबाबत मोदी खोटे बोलले काय? असे लिहित ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील ‘रोखठोक’ सदरांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. राऊतांनी या सदरांत चंदिगडच्या महापौर निवडणुकीत इंडिया आघाडीचा झालेला पराभव, महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेवकर यांनी ठाकरे गटाच्या विरोधात दिलेला निकाल, विरोधकांच्या मागे लावलेली केंद्रीय तपास यंत्रणा याबाबत केंद्र सरकारवर आणि विशेषतः भाजपावर टीकास्त्र डागले आहे. (Did Modi lie about Ajit Pawar’s irrigation scam? Direct question from Sanjay Raut)

हेही वाचा… Sanjay Raut : महायुतीत गँगवार सुरू; अमित शहांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे

- Advertisement -

सामना वृत्तपत्रात आज (ता. 04 फेब्रुवारी) रोखठोक या सदरांत न्याय व्यवस्थेचे ‘सुलभ’ धिंदवडे या आशयाखाली राऊतांनी भाजपावर आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा झाला. त्या प्रजासत्ताक हिंदुस्थानसाठी आपल्या पूर्वजांनी केलेल्या त्यागाचा विसर आपणास पडलेला आहे. न्याय यंत्रणेचे राजकारण आणि खासगीकरण अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. ज्यांच्याकडून संविधान, न्याय व्यवस्था याबाबत निष्पक्ष वर्तनाची अपेक्षा करावी, त्या सर्व संस्था भ्रष्ट झाल्या व त्या संस्थांची सूत्रे चोरांच्या हाती दिली गेली आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळातील सत्ताधारी पक्षाचा एक आमदार जाहीर सभेत एका समुदायास खतम करण्याची, त्यांच्यावर हल्ले करण्याची चिथावणी देतो व त्याही पुढे जाऊन तो सांगतो, ‘खुशाल दंगली घडवा. मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. माझे कोण काय वाकडे करणार? गृहमंत्रीपदावर बसलेली व्यक्ती हीच माझी ‘बॉस’ आहे. तो माझ्या पाठीशी आहे.’ संविधान, कायदा, न्याय व्यवस्थेचा विध्वंस करणारी ही वक्तव्ये आहेत व गृहमंत्री डोळे बंद करून हात चोळत बसले आहेत. प्रजासत्ताकाची ही अवहेलना आहे.” आहे असे म्हणत राऊतांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर नितेश राणे यांनी सागर बंगल्यात राहणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचाही राऊतांनी समाचार घेतला आहे.

तर, न्यायाचा तराजू एकतर्फी झुकला तर आश्चर्य का वाटावे?, असा उपरोधिक प्रश्न उपस्थित करत राऊतांनी देशातील काही राजकीय घडामोडींचा निकाल हा कशा पद्धतीने एका बाजूने लावण्यात आला आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा हस्तक्षेप कसा वाढला आहे? याबाबतची उदाहरणे याबाबतची माहिती पुन्हा या सदरांतून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आशेचा किरण आहे, पण ती किरणेही आता धूसर होत आहेत. सरकारी पक्षाचा अनेक बाबतीत दबाव आहे हे आता उघडपणे लोक बोलू लागले. तारखांचा खेळ तेथेही सुरूच आहे, असा थेट आरोपही राऊतांकडून करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपविरोधी नेत्यांच्याच विरोधात सुरू आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना भाजपामध्ये घेऊन अभय दिले जाते व त्यांच्यावरील अपराधांच्या फायली न्यायालयाच्या गोडाऊनमध्ये पाठवल्या जातात. विरोधकांवर खोटे गुन्हे टाकून त्यांना जामीनही मिळू दिला जात नाही, असा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली व आसामचे भ्रष्ट मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा भाजपाच्या कळपात जाताच पवित्र झाले. देशाचे हे चित्र धोकादायक आहे. न्याय व्यवस्थेतले ‘मेरिट’ संपले आहे व सत्र न्यायालय आर्थिक स्वरूपाच्या गुन्ह्यात मेरिटवर जामीन न देता आर्थिक व्यवहाराची अपेक्षा करतात व तोपर्यंत जामीन लटकवून ठेवतात. हा भ्रष्टाचार भाजपा काळात वाढला. कारण सरकारी वकील व न्याय यंत्रणेतील नेमणुकांत त्यांचा हस्तक्षेप आहे. देश इतक्या चिंताजनक अवस्थेत पोहोचलेला आहे व फक्त रामनामाने हे मळभ दूर होईल काय? जनतेला या चिंताजनक अवस्थेची कल्पना आहे काय? असा प्रश्न राऊतांनी रोखठोकच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

त्यामुळे, प्रभू श्रीरामांचे सुशासन हीच देशाच्या घटनाकारांसाठी प्रेरणा होती, असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये सांगितले. पण श्रीराम हीच आजच्या राज्यकर्त्यांची प्रेरणा असती तर भारतीय राज्यघटनेचे इतके अवमूल्यन ‘मोदी काळा’त झालेच नसते. ‘सुलभ न्याय सर्वांचा अधिकार’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले, पण न्याय व्यवस्थेचे सुलभ शौचालय झाले आहे व डब्यात नाणे टाकल्याशिवाय प्रवेश मिळत नाही व न्यायही मिळत नाही. घटनात्मक संस्था मोडीत काढून न्याय व्यवस्थेचे खासगीकरण करणे ही श्रीरामांची प्रेरणा कधीच नव्हती. आज हिंदुस्थानी न्याय व्यवस्थेची उद्ध्वस्त बाबरीच झाली आहे! असे म्हणत राऊतांनी ठाकरे गटाच्यावतीने भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -