मुंबई : जनतेने एकदाही बहुमत देऊन शरद पवार यांना मुख्यमंत्री केले नाही, अशी टीका अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवार यांचे अनेक वर्ष विश्वासू सहकारी राहिलेले दिलीप वळसे-पाटील यांनी केली. त्यानंतर लगेचच घुमजाव करत त्यांनी मीडियावर खापर फोडले. यावरून शरद पवार गटाने त्यांच्यावर जोरदार टीका केली. पण आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीटरवरून अनोख्या पद्धीतीने वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा – डोळे कसे दिसतात यापेक्षा…, रोहित पवार यांनी मंत्री विजयकुमार गावित यांना सुनावले
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही, असे आपण म्हणतो. परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात, अशी टीका वळसे-पाटील यांनी रविवारी एका कार्यक्रमात केली होती. दिलीप वळसे-पाटील हे पवारांचे एकेकाळचे स्वीय्य सहाय्यक राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचे पवारांशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. परिणामी, शरद पवार समर्थकांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिली होती.
दिलीपराव ↩️↪️↩️↪️↩️↪️ पाटील 🤔 pic.twitter.com/nuukJoHjzj
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 22, 2023
त्यामुळे त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी घुमजाव करत, प्रसिद्धी माध्यमांवर याचे खापर फोडले. माझ्या वाक्याचा अर्थ मीडियाने चुकीचा लावलेला दिसतो. माझे संपूर्ण भाषण जर ऐकले तर लक्षात येईल की मी शरद पवारांविषयी असे उद्गार काढलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही, याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो, त्यात शरद पवार यांना कमी लेखण्याचा किंवा काही चुकीचे बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शरद पवार हे आमचे नेते आहेत, तेच भविष्यातही आमचे नेते राहतील, अशी सारवासारव त्यांनी केली.
हेही वाचा – “दीडशहाणे मंत्री कालपर्यंत…” कांद्याच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी दादा भुसेंना केले लक्ष
या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी आज, मंगळवारी एक ट्वीट केले आहे. ‘दिलीपराव पाटील’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. मात्र या दोन शब्दांमध्ये ‘वळसा’ घेण्याची चिन्हे वापरली आहेत. शिवाय, या कॅप्शनच्या खाली यू-टर्नचे मोठे चिन्ह वापरले आहे. त्यांच्या या ट्वीटची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.