Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दिलीप वळसे पाटील राजकारणापासून होते चार हात लांब, ही गोष्ट ठरली 'गेमचेंजर'

दिलीप वळसे पाटील राजकारणापासून होते चार हात लांब, ही गोष्ट ठरली ‘गेमचेंजर’

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या गृहमंत्री पदावरून पायउतार झालेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर या विभागाची धुरा ही दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आली. दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे महाराष्ट्रातील हनुमान म्हणून ओळखले जातात. एकेकाळी शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून राहिलेल्या दिलीप वळसे पाटील यांना कधीच राजकारण यायच नव्हते. पण शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांनी एक वेगळीच छाप पाडली. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकारणात दिलीप वळसे पाटील यांची शरद पवारांचे हनुमान अशी एक ओळख निर्माण झाली.

का म्हटलं जात शरद पवारांचा हनुमान ?

सध्या दिलीप वळसे पाटील यांचे वय हे ६४ वर्ष इतके आहे. दिलीप वळसे पाटील हे दिवंगत माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांचे सुपुत्र आहेत. पण दिलीप वळसे पाटील यांचा राजकारणात येण्याचाही अतिशय रंजक असा प्रवास आहे. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे सुरूवातीच्या काळात राजकारणापासून अलिप्त राहिले. पण दिलीप वळसे पाटील यांचा राजकारणातील प्रवेश हा केवळ अपघातच म्हणता येईल. आपले वडील म्हणजे दत्तात्रय वळसे पाटील यांनी आग्रह केल्यामुळेच शरद पवार यांच्याकडे स्वीय सहाय्यक म्हणून दिलीप वळसे पाटील रूजू झाले. पण सक्रीय राजकारणात मात्र येण्यासाठी त्यांचा कधीच अट्टाहास नव्हता. त्यांच्याकडे एलएलबी नंतरच्या सुरूवातीच्या काळातच त्यांच्याकडे ही महत्वाची जबाबदारी आली. शरद पवार यांच्यासारख्या नेतृत्तावमुळेच अतिशय शिस्तबद्ध आणि शांतपणे असे वळसे पाटील यांच्यावर राजकीय संस्कार होत गेले.

अन् राजकीय प्रवास झाला सुरू…

- Advertisement -

शरद पवारांसोबत अनेक वर्ष काम केल्यानंतर वळसे पाटील यांनी १९९० च्या दशकात पुण्याच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आपल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीतच त्यांनी विजयश्री खेचून आणली. तेव्हापासून सलग सहावेळा आमदार होऊन येण्याचा मान त्यांच्या नावे आहे. याआधीच्या सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अर्थ, ऊर्जा, वैद्यकीय आणि उच्च शिक्षण यासारखे विभाग मंत्रीपद म्हणून होते. जेव्हा १९९९ मध्ये शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी असण्याचा मुद्दा मांडत कॉंग्रेसला रामराम केला, तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेतील कोअर टीमपैकी एक असे वळसे पाटील होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापनेच्या वेळी संपुर्ण निर्णय प्रक्रियेत आणि अंमलबजावणीत दिलीप वळसे पाटील यांची अत्यंत महत्वाची अशी भूमिका होती.

विधानसभेतले हेड मास्तर…

दिलीप वळसे पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीत मोठा ब्रेक तेव्हा लागला, जेव्हा पक्षाने त्यांना २००९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला दिली. पक्षातील हायकमांडकडूनच हा आदेश आल्याने कॅबिनेट पदाएवजी त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. राजकारणात सहसा विधानसभा अध्यक्षपद म्हणजे राजकारणातून निवृत्ती असे ओळखले जाते. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या बाबतीत झालेल्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

- Advertisement -

विधानसभा अध्यक्षपदावरून अनेक चर्चा रंगलेल्या असतानाही दिलीप वळसे पाटील यांनी आपल्याला दिलेली जबाबदारी अतिशय चोखपणे बजावली. कडक हेडमास्तर असा नावलौकिक त्यांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान असताना मिळवला होता. त्यामुळेच विरोधकांनाही हावी न होऊ देणारे अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखले जायचे. अतिशय कडक आणि शिस्तबद्ध असा कारभार केल्यानेच त्यांना कडक हेडमास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले. विधानसभेच्या कामकाजात कायदेमंडळाचा डेकोरम मेन्टेन करणे हा त्यांच्या कामकाजाचा कडक शिस्तीची भाग होता. तसेच नवनियुक्त आमदारांना विधानसभेच्या कामरादात सहभागी होण्याची संधी देणे हे त्यांच्या काळातले असे विधानसभा अध्यक्षाकडून दिले जाणारे असे प्रोत्साहनपर कार्य होते.

ठाकरे सरकारमध्ये कामगार मंत्री ते गृहमंत्रीपद

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जेव्हा २०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली, तेव्हा दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रीमंडळात संधी देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळतानाच त्यांच्याकडे विक्रीकर आणि कामगार विभागाची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रीय फेडरेशन ऑफ कोऑपरेटीव्ही शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष म्हणूनही सध्या त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आहे.


 

- Advertisement -