मुंबई : जनतेने एकदाही बहुमत देऊन शरद पवार यांना मुख्यमंत्री केले नाही, अशी टीका अजित पवार गटाचे नेते आणि शरद पवार यांचे अनेक वर्ष विश्वासू सहकारी राहिलेले दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. वळसे पाटील हे सध्या महायुतीच्या तीनचाकी सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत. पण त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या टीकेनंतर दिलीप वळसे-पाटील यांच्याबाबत आता नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वळसे-पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार यांच्या गटातील आमदारांनी आणि नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली असताना आता त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वाक्याचा अर्थ मीडियाने चुकीचा लावलेला दिसत, असे म्हणत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर घुमजाव केल्याचे पाहायला मिळत आहे. (Dilip Walse-Patil explained the criticism of Sharad Pawar)
हेही वाचा – Sanjay Raut : “शरद पवारांच्या नावावर…” अजित पवार गटाला संजय राऊतांनी सुनावले
दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, “माझ्या वाक्याचा अर्थ मीडियाने चुकीचा लावलेला दिसतो आहे. माझे संपूर्ण भाषण जर ऐकले तर लक्षात येईल की मी शरद पवारांविषयी असे उद्गार काढलेले नाहीत. माझे म्हणणे असे होते की गेली 40 ते 50 वर्षे शरद पवार यांनी या राज्यासाठी, देशासाठी काम केले आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातले अनेक पक्ष स्वतःच्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसले आहेत. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या मागे उभी केली नाही याची मला खंत आहे. मी खंत व्यक्त करत होतो, त्यात शरद पवारांना कमी लेखण्याचा किंवा काही चुकीचे बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शरद पवार हे आमचे नेते आहेत, तेच भविष्यातही आमचे नेते राहतील,” असे स्पष्टीकरण वळसे-पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहे.
काय म्हणाले होते दिलीप वळसे-पाटील?
शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असे आपण म्हणतो. परंतु महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात, अशी खोचक टीका वळसे-पाटील यांनी केली. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी असे वक्तव्य केले आहे. खरं तर दिलीप वळसे-पाटील हे पवारांचे एकेकाळचे स्वीय्य सहाय्यक राहिलेले आहे. त्यामुळे त्यांचे पवारांशी अत्यंत घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. त्यांचा राजकारणातील प्रवास हा देखील अत्यंत चर्चेचा विषय ठरलेला आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी वक्तव्य केल्यानंतर याबाबत राष्ट्रवादीतील (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ट्वीट करण्यात आले. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “दिलीप वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही, याच आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले. वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही… पण आदरणीय साहेबांच्यासाठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल.”