दिलीप वळसे-पाटील हे शरद पवार यांचे मानसपूत्र. मात्र, राष्ट्रवादीतील बंडानंतर वळसे-पाटील यांनी अजितदादा पवार यांना साथ दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी वळसे-पाटलांना पाडण्याचा चंग बांधला होता. मात्र, वळसे-पाटील हे पवारांच्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले. विजयी होताच तिसऱ्या दिवशी वळसे-पाटील हे पवारांच्या भेटीसाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गेले आहेत.
पुण्यातील आंबेगाव हा वळसे-पाटलांचा मतदारसंघ. शरद पवार यांनी वळसे-पाटील यांच्याविरुद्ध देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली होती. वळसे-पाटील यांच्याविरुद्ध शरद पवार यांनी रान उठवलं होतं. ‘गद्दार’ आणि ‘पाडा-पाडा-पाडा’ म्हणत वळसे-पाटील यांना पराभूत करण्याचं आवाहन शरद पवार यांनी आंबेगावकरांना केलं होतं.
हेही वाचा : “बारामती लढली नसती, तर वेगळा संदेश गेला असता”, शरद पवारांच्या विधानावर अजितदादा म्हणाले, “माझ्या भावाच्या…”
मात्र, वळसे-पाटील यांचा थोडक्या मतांनी विजय झाला आहे. येथे ‘ट्रम्पेट’ला मते गेल्यानं देवदत्त निकम यांचा पराभव झाला आहे. विजयी होताच तिसऱ्या दिवशी वळसे-पाटील शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे गेले आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वळसे-पाटील म्हणाले, “यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्यकारणीची बैठक होती. त्यामित्त मी आलो होतो. मी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.”
हेही वाचा : “10 मिनिटांत यांना आमदार केलं, मात्र आता फडणवीसांचा हा पठ्ठ्या…”, राम सातपुतेंचा रणजितदादांना इशारा