पवार आणि बृजभूषण यांच्या फोटोचा राजकारणाशी संबंध नाही, मनसेच्या त्या ट्विटवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात बृजभूषण सिंह यांना राष्ट्रवादीने रसद पुरवली असल्याचा आरोप मनसैनिकांकडून करण्यात आला.

dilip walse patil reaction mns sharad pawar and brijbhushan singh photo for raj thackeray ayodhya tour
पवार आणि बृजभूषण यांच्या फोटोचा राजकारणाशी संबंध नाही, मनसेच्या त्या ट्विटवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray)  अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप खुद्द राज ठाकरेंनीच केला. यानंतर मनसे नेत्यांकडून बृजभूषण आणि शरद पवारांचा (sharad pawar) फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोवरून आता राज्यातील राजकारणात उलट सुलट चर्चांना उधाण आलयं. दरम्यान मनसेने ट्विट केलेला फोटो तीन वर्ष जूना असल्याचे बृजभूषण सिंह यांनी सांगितले आहे. तसेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याविरोधात बृजभूषण सिंह यांना राष्ट्रवादीने रसद पुरवली असल्याचा आरोप मनसैनिकांकडून करण्यात आला. मात्र हे आरोप राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आज फेटाळून लावले आहेत. शरद पवार गेल्या अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे प्रमुख आहेत. आणि उत्तरप्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (brijbhushan sharan singh) त्यांच्या राज्यातील कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे जुन्या काळात महाराष्ट्रातील एका कुस्ती कार्यक्रमातील तो फोटो दिसतोय. मागील पोस्टरवरून तो फोटो कुस्तीच्या कार्यक्रमातील असल्याचे स्पष्ट होतेय. त्यामुळे त्या फोटोचा राजकारणाशी संबंध लावण्याचं कारण नसल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

वातावरण अस्थिर करण्याचे प्रयत्न

ज्ञानवापी मशिद वाद प्रकरणानंतर (Gyanvapi Mosque Case) पुण्यातील मशीद वाद प्रकरणावर बोलताना वळसे पाटील म्हणाले की, “औरंगजेबाची कबर आणि मंदिर मशिदींचा विषय काढून देशामध्ये आणि राज्यात एकप्रकारे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. या गोष्टीला इतकं महत्त्व देता कामा नये. आता 400, 600, 1000 वर्षापूर्वी ज्या गोष्टी घडल्या घटना घडल्या ज्यातून मंदिर, मशीद वाद घडवून अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि तो निषेधार्ह आहे. त्यामुळे अशाप्रकारे कृती आणि वक्तव्ये करु नये, यावर वक्तव्य केली तर पोलीस त्याची गांभीर्याने दखल घेतील,” असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.

हेही वाचा : “ब्रिज”चे निर्माते म्हणत मनसेकडून पवार आणि बृजभूषण सिंहांचा फोटो ट्विट, राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात रसद पुरवल्याचा आरोप

विरोधकांच्या महागाईच्या मुद्द्यावर वळसे पाटील म्हणाले की, “महत्त्वाच्या मुद्यांवर कोणाला चर्चाच करायची नाही, फक्त आरोप प्रत्यारोपांचच सत्र सुरु आहे. मुळ विषयावरून लोकांचं लक्ष दूर हटवण्यासाठी जाणीवपूर्वक अशाप्रकारच्या क्‍ल्युप्त्या शोधून काढल्या जात असून त्याआधारे राजकारण केले जातेय.”

नवाब मलिकांना अडकवण्याचा प्रयत्न

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Ncp Nawab Malik) यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, जुन्या काळातील काय व्यवहार झाला आणि ईडीला काय मिळाले हा तपासाचा भाग आहे. परंतु नवाब मलिक निर्दोष आहेत” असा आमचा विश्वास असल्य़ाचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी गृहमंत्र्यांनी किरीट सोमय्यांनी केलेल्या बुलेटप्रुफ जॅकेटबाबतचे आरोप फेटाळून लावले आहेत.

तोपर्यंत ओबीबी आरक्षण लागू झालेले असेल

ओबीसींच्या (Obc Reservation) राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, सर्व पक्षांचा ओबीसी आरक्षणाबाबत आग्रह आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सर्वोच्च न्यायालयात जाऊन खटला लढवत आहेत. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला तरी महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे की, प्रत्यक्षात निवडणूकीपूर्वी ओबीसी आरक्षण लागू झालेले असेल. त्यासाठी आवश्यक इम्पिरियल डेटा सर्वोच्च न्यायालात देऊन मध्यप्रदेशप्रमाणे ऑर्डर घेऊन ओबीसी वर्गाला निवडणुकीत प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.


नाशकात रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन; ९ गुन्हेगारांवर कारवाई