घरमहाराष्ट्रDG Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचे परिपत्रक, घेतला महत्त्वाचा निर्णय

DG Rashmi Shukla : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचे परिपत्रक, घेतला महत्त्वाचा निर्णय

Subscribe

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक झाल्यापासून त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील जनतेसाठी खुले पत्र लिहिले होते. ज्याची सर्वत्र चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांसाठीच परिपत्रक काढत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर त्यांना निरोप देताना दिले जाणारे निरोप समारंभ व फेटे बांधून जीपमधून त्यांची मिरवणूक काढणे, यावर बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे आता अशा पद्धतीने निरोप देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी परिपत्रकातून दिला आहे. (Director General of Police Rashmi Shukla took an important decision for the police)

हेही वाचा… Election Commission : निवडणूक आयोगाने घेतली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, काय आहे कारण?

- Advertisement -

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या परिपत्रकात लिहिले आहे की, महाराष्ट्र राज्य पोलीस (Maharashtra Police) दलातील विविध दर्जाच्या पोलीस अधिकारी / अंमलदार यांच्या शासन नियमानुसार, तसेच प्रशासकीय कारणास्तव बदल्या होत असतात. बदली (Transfer) ही एक नित्याची बाब (Routine Procedure) आहे. अशा एका घटकातून / ठिकाणाहून दुसऱ्या घटकांत / ठिकाणी बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या सन्मानार्थ विविध पोलीस ठाणे / शाखांमध्ये निरोप समारंभ आयोजित केले जातात.

अशा समारंभांमध्ये संबंधित पोलीस अधिकारी हे पोलीस गणवेश (Police Uniform) परिधान केलेला असतांना त्यावर रंगीत फेटे बांधणे, त्यांच्यावर फुलांचा अति प्रमाणात वर्षाव करणे, त्यांना वाहनात बसवून संबंधित पोलीस ठाणे / शाखेच्या अधिकारी / अंमलदार यांनी वाहनास दोरीने ओढत नेणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच त्यांना शासकीय वाहनात बसवून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांसारखा त्यांना निरोप दिला जातो. असे प्रकार पोलीस दलाच्या प्रमाणित कार्यपध्दतीला अनुसरुन नाही, असेही या परिपत्रकांत स्पष्ट करण्यात आले आहेत.

- Advertisement -

अशा प्रकारच्या गौरव सोहळ्याचा कार्यक्रम अधिकारी स्वतः किंवा त्यांच्या हस्तकामार्फत प्रसिध्दी मिळविण्यासाठी सोशल मीडियावर प्रसारित करतात. त्यामुळे उलट ते जनमाणसांत चेष्टेचा, उपहासाचा विषय बनतात. स्थानिक नागरिक हे अधिकाऱ्याने केलेल्या चांगल्या कामांचा, कर्तृत्वाचा नेहमी सन्मान करतात, न की अशा दिखाव्याचा. सर्व पोलीस घटक प्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये / शाखांमध्ये बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या बदलीचा निरोप समारंभ आयोजित करताना वरील प्रकार होणार नाहीत, याची कटाक्षाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

तशा सूचना त्यांचे अधिनस्थ सर्व पोलीस ठाणे / शाखा प्रभारी अधिकारी, सर्व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना सक्त सूचना देणे आवश्यक आहे. उपरोक्त सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास / पालन करण्यात कसुरी केल्यास संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्याची जबाबदारी सर्व घटक प्रमुख व त्यांचे पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांची असेल. तसेच अशी कुठलीही बाब पोलीस मुख्यालय यांच्या निदर्शनास आली, तर संबंधित घटक प्रमुखांना जबाबदार ठरविले जाईल, असा थेट इशाराच या परिपत्रकाच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -