घरमहाराष्ट्रDG Rashmi Shukla : 'पोलिसांवरील विश्वास कमी झाला...'; महासंचालक रश्मी शुक्लांनाही चूक...

DG Rashmi Shukla : ‘पोलिसांवरील विश्वास कमी झाला…’; महासंचालक रश्मी शुक्लांनाही चूक मान्य

Subscribe

मुंबई : काल गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) ठाकरे गटाचे माजी आमदार आणि नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेच्या काही तासानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी जनतेला आवाहनपर पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याशिवाय त्यांनी राज्यातील जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झाला असल्याचेही मान्य केले आहे. X या सोशल मीडिया साइटवरील महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत अकाउंटवरून हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Director General of Police Rashmi Shukla’s open letter to the public)

काय आहे रश्मी शुक्ला यांच्या पत्रात?

मी राज्य पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारून एक महिना झाला आहे. हे औचित्य साधत राज्याच्या सर्व पोलिसांच्या वतीने तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि या अल्प कालावधीत मिळालेली शिकवण आणि पुढील वाटचालीच्या दृष्टीने माझे ध्येय तुमच्यासोबत शेअर करते.

- Advertisement -

महाराष्ट्र पोलीस दलातील समर्पित स्त्री-पुरुषांच्या बरोबरीने पुन्हा एकदा सेवा आणि संरक्षण करण्याच्या या विशेषाधिकाराबद्दल मी आधीच आभार व्यक्त करते. मी आतापर्यंत जे पाहिले आहे, अनुभवले आहे त्यावरून मला खात्री आहे की महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपेकी एक आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलीस दलावरील विश्वास कमी झाला आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून, तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहील.

- Advertisement -

केंद्रीय पोलीस दलाचे नेतृत्व करताना मिळालेल्या अनमोल अनुभव गाठीशी घेऊन मी राज्यात परतले आहे. राज्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व्यावसायिक आणि उच्च दर्जाच्या वागणुकीचे पालन करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. आम्ही पोलीस आणि जनता यांच्यातील पूल पुन्हा बांधू पोलीस दलातील कोणत्याही सदस्याकडून हिंसा, शोषण किंवा गैरवर्तनाची कोणतीही अन्यायकारक कृत्ये आमच्याकडून खपवून घेतली जाणार नाहीत. जर राज्यातील कोणत्याही नागरिकाला त्रास होत असेल आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना न्याय मिळू शकत नसेल, तर ही गोष्ट पोलीस महासंचालक कार्यालयात आमच्या निदर्शनास आणून देण्याची मी विनंती करते. माझे सहकारी आणि मी तुम्हाला लवकरात लवकर मदत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू.

आमचे पोलीस दल सुरक्षितता आणि परिणामकारकतेने त्यांची कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक संसाधने आणि प्रशिक्षणाने सुसज्ज आहेत. त्याची खात्री करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. डीजीपी या नात्याने दररोज आपला जीव धोक्यात घालणाऱ्या धाडसी पोलिसांना मी सर्वतोपरी पाठिंबा देईल.

आपल्यासमोर अनेक निरनिराळी आव्हाने आहेत आणि आपल्याला निश्चितच काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. पण मी तुम्हाला खात्री देते की माझ्या कार्यकाळात महाराष्ट्र पोलीस या आव्हानांना न डगमगता किंवा पक्षपातीपणा न ठेवता सामोरे जातील. या कार्यात आपण एकटे यशस्वी होऊ शकत नाही. या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला तुमचे सहकार्य आवश्यक आहे. त्या कालावधीत तुमच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मी तुमच्याशी थेट संपर्क साधण्यास उत्सुक आहे. तोपर्यंत आपण मला पाठिंबा द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. कारण आपण सर्व एकत्रितपणे या नवीन अध्यायाला सुरुवात करत आहोत. जिथे प्रत्येकजण निर्भयपणे जगू शकेल, काम करू शकेल आणि भरभराट करू शकेल, असा महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही अविरत कार्य करू.

रश्मी शुक्ला यांची कारकीर्द…

महिन्याभरापूर्वी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात. रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्‍यांपैकी एक आहेत. सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.


हेही वाचा… Nana Patole: राज्यकर्त्यांसोबत गुंड फिरतात, हे गुंडांचं सरकार आहे का? नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -