राहुल गांधींच्या सावरकरांविरोधी वक्तव्याशी सहमत नाही, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

uddhav thackeray rahul gandhi

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान केला होता. त्यांच्या या वाक्यावरून राज्यभर गदारोळ सुरू आहे. तसंच, आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची गळाभेट घेतल्याने शिवसेनेवर बाण सोडले जात आहेत. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसंच, स्वातंत्र्यवीरांनी जे स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्याग केला होता, तेच स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरता आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आज उद्धव ठाकरे यांनी स्मृतीस्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या जुन्या महापौर निवास येथे एका व्यंगचित्र प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा राहुल गांधी-आदित्य ठाकरे यांची गळाभेट, रणजित सावरकरांनी शिवसेनेला दिला इशारा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आमच्या मनात अतिव प्रेम, आदर, निष्ठा आहेच. पण ज्यांचा स्वातंत्र्यसंग्रमाशी संबंध नाही, त्यांनी याविषयी बोलूच नये. आरएसएसला आता शंभर वर्षे पूर्ण होतील. पण या संघाचेही स्वातंत्र्यसंग्रमात काहीच योगदान नव्हते. ते स्वातंत्र्यलढ्यापासून लांब होते. त्यामुळे त्यांनी बोलूच नये. स्वातंत्र्य धोक्यात आल्यानंतर ते एकत्र आले आणि आता स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. जे आरोप करत आहेत त्यांनी त्यांच्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान सांगावं आणि मगच आम्हाला बोलावं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – बाळासाहेब आणि वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?, संजय राऊतांचा सवाल

भारतरत्न देण्याचा अधिकार पंतप्रधांनाना आहे. नरेंद्र मोदी गेली आठ वर्षे पंतप्रधान पदी आहेत. त्यांनी सावरकरांना अद्याप भारतरत्न का दिला नाही, असा प्रश्नही ठाकरेंनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान धोक्यात आले आहे. ते वाचवण्यासाठी जेवढे सोबत येतील त्यांना घेऊन चालणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

…आणि स्वतःला प्रेझेंट करतात

महापौर बंगल्यात लवकरच बाळासाहेबांचे स्मारक होईल. काहीजण चित्रपट काढतात. आणि स्वतःला प्रेझेंट करतात. मात्र, आम्ही बाळासाहेब यांच्या स्मारकाबाबत असं होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – बाळासाहेब आणि वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही?, संजय राऊतांचा सवाल