घरमहाराष्ट्रपुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून आघाडीत मतभेद

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून आघाडीत मतभेद

Subscribe

पुण्यातील पोटनिवडणूक लढवणार- विजय वडेट्टीवार, गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही- अजित पवार

भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. काँग्रेसने पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढविण्याचे जाहीर केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र पोटनिवडणूक लढविण्यावरून लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही, असे काँग्रेसला नाव न घेता सुनावले आहे.

गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार लोकसभा अथवा विधासभेची मुदत संपण्यास एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असल्यास जागा रिक्त झाल्यापासून ६ महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते. विद्यमान १७ व्या लोकसभेची मुदत १६ जून २०२४ रोजी संपत आहे. लोकसभेचा कालावधी संपण्यास अजून १५ महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने निवडणूक अयोगाकडून पोटनिवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मात्र निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नसताना आघाडीतील काँग्रेसला पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे वेध लागले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकल्यामुळे काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. त्यामुळे काँग्रेसचे विदर्भातील नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुणे लोकसभेच्या जागेबाबत भाष्य केले. आमची आघाडी ठरलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार आहोत. भाजपने यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत अनेकदा उमेदवार दिले आहेत. त्यामुळेच आता ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल, ती पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढवेल, असे वडेट्टीवार यांनी जाहीर केले.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे पोटनिवडणुकीवरून काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. लगेच कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. गिरीश बापट यांच्या निधनाला केवळ ३ दिवस झाले आहेत. घाई करायची काय गरज आहे? माणुसकी नावाचा प्रकार आहे की नाही. महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत. अशी विधाने केली तर महाविकास आघाडीला जनाची नाही पण मनाची लाज वाटते की नाही, असे लोक म्हणतील, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -