मुंबई : विश्वचषक 2023 मधील मनोरंजक असा सामना काल मंगळवारी (ता. 7 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान या दोन संघामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियापुढे 292 धावांचे लक्ष ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 73 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत परतले. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाचे आणखी दोन खेळाडू काहीशाच धावा करून तंबूत परतले. तेव्हा ऑस्ट्रेलियाची स्थिती ही 7 गडी बाद 125 धावा अशी असताना फलंदाजीसाठी उतरलेल्या पण जायबंदी झालेल्या ग्लेन मॅक्सवेलने एकाकी झूंज देत सामना अटीतटीच्या स्थितीपर्यंत आणून सोडला नाही तर त्याने विश्वचषकात 201 धावांची खेळी करत अफगाणिस्तानवर विजय मिळवला. ज्यानंतर मॅक्सवेल हा सुपरहिरो ठरला. (Discussing Rohit Pawar’s tweet, posting a photo of ‘Sharad Pawar and Maxwell’ wrote…)
हेही वाचा – “ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा दुहेरी घाट”, छगन भुजबळांचा मराठा आंदोलकांवर आरोप
मॅक्सवेलच्या झुंजार खेळीनंतर जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा मॅक्सवेल याला शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, रोहित यांनी शरद पवार यांचा निवडणूक प्रचारावेळी पावसात भिजतानाचा फोटो आणि ग्लेन मॅक्सवेलचा फोटो त्यांच्या X या सोशल मीडिया साईटवर पोस्ट केला आहे. मॅक्सवेलच्या द्विशतकाचा संबंध पवारांनी थेट शरद पवार यांच्या पावसातील सभेशी जोडला आहे. “परिस्थिती कितीही विरोधात असली तरी नुसते लढावेच लागते असे नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो..” असा मथळा या फोटोसाठी लिहिण्यात आला आहे. रोहित पवारांनी केलेल्या या ट्वीटची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “परिस्थिती कितीही विरोधात असली.. मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं… नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो… अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते…मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय! हेच काल ग्लेन मॅक्सवेलनं दाखवून दिलं..” रोहित पवारांच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. एका नेटकऱ्याने या पोस्टमध्ये कमेंट करत लिहिले आहे की, “”कुटुंबासाठी लढणे” आणि “देशासाठी लढणे” यात फरक असतो…” तर आणखी एकाने लिहिले आहे की, “पवार साहेब मतांसाठी पावसात भिजलेत अन् मॅक्सवेल देशासाठी घामाच्या पावसात… कशी काय तुलना होऊ शकते..😆😆😆”
परिस्थिती कितीही विरोधात असली.. मैदानात ‘योद्धा’ जखमी झाला तरी वेदनांना गाडून त्यावर हास्याचा लेप लावत त्वेषानं लढावंच लागतं… नुसतं लढावंच लागत असं नाही तर शानदार पद्धतीने विजयही खेचून आणावा लागतो… अशा वेळी परिस्थितीही नक्कीच साथ देते…
मग ते मैदान क्रिकेटचं असो की राजकीय!… pic.twitter.com/lzkST86EWE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 8, 2023
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडल्याने पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा करण्यात येत असल्याने यासाठी न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनी पुन्हा एकदा राजकीय मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या राजकीय लढाईची आणि ग्लेन मॅक्सवेलच्या विजयी खेळीची एकमेकांशी तुलना केली आहे.