पवार कुटुंबीय देवळात गेले तरी चर्चा अन् नाही गेले तरी चर्चा, मनसेच्या दाव्यात किती तथ्य?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) नास्तिक असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता. त्यानंतर लगेचच शरद पवार यांच्या पुणे दौऱ्यातील एका घटनेवरून पुन्हा तीच चर्चा रंगली. तर, आता शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या भैरवनाथ मंदिरातील दर्शनावरून वादंग निर्माण झाला आहे. एकूणच पवार कुटुंबीय देवळात गेले तरी चर्चा घडते आणि नाही गेले तरी चर्चाच होते.

गेल्या वर्षी औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीरसभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरवरील अजानवर आक्षेप घेतानाच शरद पवार हे नास्तिक असल्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांचा दाखला देताना, ‘त्यांनीही संसदेत माझे वडील नास्तिक’ असल्याचे म्हटले असल्याचे सांगितले. पण शरद पवार यांनी लगेच हा दावा फेटाळून लावला. मी नास्तिक नाही, पण मला दिखावा करायला आवडत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचे म्हणणे कोणी गांभिर्याने घेऊ नये, असा सल्ला दिला.

यानंतर अवघ्या काही दिवसांनंतर शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात गेले. पण तिथे मंदिरात न जाता, बाहेरूनच दर्शन घेऊन परतले. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्याबाबत चर्चा रंगली. शरद पवारांनी सामिष भोजन केल्याने ते मंदिरात गेले नाहीत, बाहेरूनच त्यांनी दर्शन घेतले, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत करण्यात आला.

तर, ‘आपले वडील नास्तिक असल्याचे’ लोकसभेत सांगणारी त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे या मांसाहार करून भैरवनाथ मंदिरात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी याबाबतचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. ‘मी सकाळपासून या परिसरातल्या पाण्याच्या प्रश्नात आहे. त्यामुळे ते काय बोलले मला माहिती नाही,’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

एकूणच या सर्व प्रकारांत राज ठाकरे यांनी केलेला दावा आणि त्या पार्श्वभूमीवर पवार पिता-कन्येने केलेली कृती खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत, असे मत व्यक्त होत आहे.