घरमहाराष्ट्रएसआयटी चौकशीचा फास दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा नव्याने तपास

एसआयटी चौकशीचा फास दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा नव्याने तपास

Subscribe

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, विधानसभेत सत्ताधारी पक्ष आक्रमक, कामकाज पाच वेळा तहकूब

नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी केली असताना बुधवारी लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण उकरून काढले. सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मोबाईलवर एयू नावाने ४४ फोन कॉल आले होते. हे नाव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे आहे की अन्य कुणाचे हे तपास यंत्रणांनी उघड करावे, अशी मागणी करीत शेवाळेंनी ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

त्याचेच पडसाद गुरुवारी नागपूर हिवाळी अधिवेशनातही उमटले. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत मांडून सभागृहातील कामकाजाला वेगळे वळण दिले. याप्रकरणी भाजप नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्यानंतर दिशा सालियनच्या मृत्यूची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. जे नवे पुरावे मांडले जात आहेत त्याआधारे ही चौकशी केली जाईल. चौकशीत कुणालाही लक्ष्य केले जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरण उपस्थित केले. या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. दिशा सालियनने सुशांतसिंहला कुणाचा फोटो पाठवला, तिच्या मृत्यूचे गूढ अद्याप का उकलले नाही, तिच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल उघडकीस येऊ नये म्हणून कुणी प्रयत्न केले, असे सवाल करीत गोगावले यांनी दिशाच्या मृत्यूचा छडा लावण्यासाठी फेरतपास करण्याची मागणी केली. पाठोपाठ भाजप आमदार नितेश राणे, अमित साटम, मनीषा चौधरी, देवयानी फरांदे आदींनी हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरत चौकशीची मागणी केली. त्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी अनेकदा अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी केली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज पाच वेळा तहकूब करावे लागले. अखेर फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार शांत झाले.

नितेश राणे यांनीही दिशा सालियन मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी करताना या प्रकरणात दोनदा तपास अधिकारी बदलण्यात आल्याचे सांगितले. ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री नेमके काय झाले, त्यावेळी कोणता मंत्री उपस्थित होता, ८ तारखेच्या पार्टीत काय झाले, दिशाच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गायब का झाले, दिशा राहत असलेल्या सोसायटीच्या व्हिजिटर बुकची पाने का फाडण्यात आली, दिशाने सुशांतला जो फोटो मोबाईलमधून पाठविला त्यात कोण होते, आता जो दिल्लीपासून मुंबईपर्यंत विषय सुरू आहे त्यातील एयू कोण आहे, या सगळयांची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. कुण्या बड्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न तर यातून होत नाही ना, अशा प्रश्नांची सरबत्ती राणे यांनी केली.

- Advertisement -

भाजपच्या भारती लव्हेकर, मनीषा चौधरी, देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ या महिला आमदारांनी मयत दिशाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. भारती लव्हेकर यांनी एसआयटी चौकशी करा, असे म्हटले. मनीषा चौधरी यांनी दिशा सालियनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होत असताना कूपर रुग्णालयातील सीसीटीव्ही का बंद होता, असा प्रश्न केला. अमित साटम यांनी दिशा सालियनचा मृत्यू हे केवळ एका युवतीच्या मृत्यूचे प्रकरण नाही, तर मुंबईच्या प्रतिमेचा, इभ्रतीचा प्रश्न आहे. अनेक तरुण, तरुणी मुंबईत नशीब आजमावण्यासाठी येत असतात. अशा वेळी एखाद्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू होत असेल तर मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर आले पाहिजे आणि दिशाच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल बाहेर आला पाहिजे, अशी मागणी साटम यांनी केली.

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची मागणी लक्षात घेऊन फडणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्याची घोषणा केली. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिशा सालियनचा मृत्यू इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्यामुळे झाल्याचा आणि हा मृत्यू अपघाती असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढल्याचे सांगितले. त्यावर फडणवीस यांनी दिशा सालियन मृत्यूचे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे कधीच नव्हते. त्यामुळे सीबीआयने यासंदर्भात तपास बंद अहवाल देण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा केला.

दरम्यान, अजित पवार यांनी दिशा सालियन प्रकरणात तिच्या आईवडिलांनी व्यक्त केलेल्या भावनांची माहिती सभागृहाला दिली. दिशाच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याने त्याचा आम्हाला त्रास होत आहे. आम्हाला जगू दिले जात नाही. राजकीय नेते आपल्या मुलीला बदनाम करीत आहेत, अशी भावना दिशाच्या आईवडिलांनी बोलून दाखवली असल्याचे पवार म्हणाले. त्यामुळे आता चौकशी करायचीच असेल तर पूजा चव्हाणच्या मृत्यूचीही चौकशी करा, अशी मागणी करताना पवार यांनी विरोधी पक्षात असताना भाजपची याच चौकशीच्या मागणीसाठी सभागृह बंद पाडण्यापर्यंत मजल गेली होती याकडे लक्ष वेधले.

पूजा चव्हाण मृत्यूचीही चौकशी करा
महाराष्ट्रातील एका मुलीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी सरकार करीत असेल तर अशाच इतर प्रकरणांचीही चौकशी सरकारने करायला हवी. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची केस बंद झाली असली तरी ती रिओपन करता येते. त्यामुळे पूजा चव्हाणच्या मृत्यूचीही चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.

३२ वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवले – आदित्य ठाकरे

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिशा सालियान मृत्यूप्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली. यानंतर विधान भवनात पत्रकारांशी बोलताना राज्यातील खोके सरकारला ३२ वर्षांच्या तरुणाने हलवून ठेवल्याचे आजच्या प्रकारावरून दिसून आले, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सभागृहात सत्ताधारीच वेलमध्ये उतरून आंदोलन करतात असे मी गेल्या अडीच वर्षांत कधीही पाहिले नाही. सभागृहाचे कामकाज तर मी लहानपणापासून बघत आलो आहे, मात्र असा गोंधळ मी कधी पाहिला नव्हता. आम्ही राज्यपाल हटावची मागणी सतत करीत आहोत. महाराष्ट्राचा अपमान करणार्‍यांविरोधात आंदोलन करीत आहोत. त्यांच्या नेत्यांना पाठोपाठ बोलण्याची संधी मिळते, पण आम्ही बोलायला लागल्यावर सभागृह तहकूब होते. विधानसभा अध्यक्ष आणि तालिका अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही एनआयटी घोटाळा उघडकीस आणला आहे. सभागृहात यावर चर्चाच होऊ नये यासाठी हा मुद्दा उकरून काढला जात आहे. महापुरुषांचा अपमान करणार्‍या राज्यपालांना तसेच मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. त्यांना जे काही शोधायचे आहे ते शोधू द्या. यावरून ३२ वर्षांच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवल्याचेच दिसून येते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -