घरमहाराष्ट्रपुणेCongress : ...तर राहुल गांधींच्या न्याय यात्रेला काय अर्थ? रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीमुळे...

Congress : …तर राहुल गांधींच्या न्याय यात्रेला काय अर्थ? रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी

Subscribe

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना दीड वर्षातच राज्यातून थेट दिल्लीत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल गुरुवारी काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी उपमहापौर आबा बागूल यांनी धंगेकरांच्या उमेदवारीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. (Displeasure in Congress in Pune after giving candidature to Ravindra Dhangekar)

हेही वाचा… Vijay Shivtare : …तर भाजपाच्या चिन्हावरही निवडणूक लढवेन, शिवतारेंमुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली

- Advertisement -

माजी उपमहापौर आबा बागूल हे महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर बागुल यांनी थेट पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली. याबाबत आबा बागूल म्हणाले की, ‘‘गेली चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मी प्रबळ इच्छुक होतो. पक्षाने माझी उमेदवारी का नाकारली याचा खुलासा झाला पाहिजे. दुसऱ्या पक्षातून येऊन जेमतेम दीड वर्षे होत नाही ते आमदार झाले. मात्र त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करून निष्ठेची हत्या करण्यासारखेच आहे, अशा शब्दात त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

तर, काँग्रेसमध्ये माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे कार्यकर्ते असताना त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच खेदजनक आहे. काँग्रेसचे उमेदवारी देण्याचे धोरण आहे, त्यात एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली. पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे, अशी टीकाही आबा बागूल यांनी केली आहे. त्यामुळे आता आबा बागूसल हे काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक घेऊच पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत गेल्या वर्षी धंगेकर यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात विजय मिळविल्याने त्यांचे नाव सर्व राज्यभर चर्चिले गेले होते. महाविकास आघाडीने त्यावेळी एकत्रित निवडणूक लढवली होती. पण आता धंगेकरांना थेट दिल्लीत पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आला आहे. तर मविआकडून इच्छुक असलेले पुण्यातील डॅशिंग नेते वसंत (तात्या) मोरे यांनाही डावलण्यात आले आहे. त्यामुळे आता ते देखील अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -