मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊन जवळपास अडीच महिने झाले तरी जिल्ह्याचे पालकमंत्री पद न मिळाल्याने राष्ट्रवादीत नाराजी आहे. गणेशचतुर्थीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन पालकमंत्रिपदाची फेररचना केली जाईल असे राष्ट्रवादीला सांगण्यात आले होते. मात्र, तसे न झाल्याने राष्ट्रवादीला पालकमंत्रिपदासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा करावी लागेल अशी चिन्हे आहेत.(Displeasure in NCP over Guardian Ministership Request for redistribution)
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खात्यासाठी काही दिवस वाट पहावी लागली होती. खाते मिळाल्यानंतर लगेच पालकमंत्रिपदही मिळेल, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती. मात्र, आता जवळपास तीन महिने होत आले तरी पालकमंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही. गणेशोत्सवापूर्वी पालकमंत्रिपदाचा निर्णय होईल असे आम्हाला सांगण्यात आले होते. परंतु, अद्याप निर्णय झालेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याने सांगितले.
हेही वाचा : CANADA-INDIA CRISIS: कॅनडाचे एक पाऊल मागे; भारतविरोधी पोस्टर, बॅनर हटविण्याचे आदेश
या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून वाद
दरम्यान, पालकमंत्री पदावरून महायुतीत एकमत होत नसल्याने पालकमंत्रिपदाची फेररचना लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. महायुतीत पुणे, नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदावरून मतभेद आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वतः अजित पवार यांना हवे आहे. मात्र, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्रिपद सोडण्यास तयार नाहीत. भाजपने पुणे सोडून अन्य जिल्ह्याचा पर्याय सूचवला आहे. परंतु, राष्ट्रवादी तो मान्य करायला तयार नाही.
हेही वाचा : संयुक्त राष्ट्राकडून भारताचे कौतुक; ‘या’ कारणामुळे होत आहे शुभेच्छांचा वर्षाव
नाशिकसाठी भुजबळ तर रायगडसाठी तटकरे आग्रही
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना देण्यास एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांचा विरोध आहे. मात्र, हा विरोध डावलून रायगडचे पालकमंत्रिपद तटकरे यांना दिले जाण्याची शक्यता आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. सध्या नाशिकचे पालकमंत्रिपद शिंदे गटाकडे आहे. राष्ट्रवादीला कोल्हापूर, बीड, जळगाव, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद हवे आहे. त्यामुळे हा तिढा सुटल्यानंतरच राष्ट्रवादीच्या वाट्याला पालकमंत्रिपद येईल, अशी सध्याची स्थिती आहे.
सध्याचे पालकमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली
राधाकृष्ण विखे पाटील : अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार :चंद्रपूर, गोंदिया
चंद्रकांत पाटील :पुणे
डॉ. विजयकुमार गावित :नंदूरबार
गिरीश महाजन : धुळे, लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील : बुलढाणा, जळगाव
दादा भुसे : नाशिक
संजय राठोड -: यवतमाळ, वाशिम
सुरेश खाडे : सांगली
संदिपान भुमरे : छत्रपती संभाजीनगर
उदय सामंत : रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत -: परभणी, धाराशिव
रवींद्र चव्हाण : पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार : हिंगोली
दीपक केसरकर : मुंबई शहर, कोल्हापूर
अतुल सावे :जालना, बीड
शंभूराज देसाई : सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा : मुंबई उपनगर