लोकसभेंच्या जागांबाबत भाजप-शिवसेनेमध्ये धुसफूस? शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी

भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये देखील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरु असल्याचे दिसून आले आहे. आगामी लोकसभेसाठी शिवसेना 22 जागांची तयारी करत असल्याचे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते राहुल शेवाळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Dispute between BJP and Shiv Sena regarding Lok Sabha seats? Resentment among Shinde group leaders

आगामी लोकसभा निवडणुकांसामध्ये राज्यातील कोणता पक्ष किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. महाविकास आघाडीमध्ये 2024 लोकसभेसाठी 16-16-16 असा फॉर्मुला ठरल्याची माहिती समोर आलेली असतानाच ठाकरे गटाने 19 जागांवर दावा केला आहे. त्यामुळे मविआमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून काहीच आलबेलं नसल्याचे दिसून येत आहे. तर आता भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये देखील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरु असल्याचे दिसून आले आहे. आगामी लोकसभेसाठी शिवसेना 22 जागांची तयारी करत असल्याचे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते राहुल शेवाळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभेसाठी असलेलं भाजपचं मिशन 45 नेमकं कसं साध्य होणार हा मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे.

हेही वाचा – “आम्ही घरात बसून नाही तर फिल्डवर काम करणारे लोकं..”; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभेंच्या जागांसदर्भात माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 13 खासदारांची बैठक घेतली. त्यात लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. दरम्यान, 2019 मध्ये महायुतीत शिवसेनेने 22 जागा लढल्या होत्या. त्या ठिकाणी तयारी करण्याची तयारी करण्याची चर्चा बैठकीत झाली आहे.”

पण या जागा वाटपांबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये अद्यापतरी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे जागा वाटपांबाबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजचे केंद्रीय नेते निर्णय घेतील, अशी माहिती देखील राहुल शेवाळे यांच्याकडून देण्यात आली आहे. महायुती लोकसभेसाठी दौरे करणार असल्याचे शेवाळे यांनी सांगिले. सध्याचे 13 खासदार व इतर जागांसह पराभूत झालेल्या ठिकाणीही शिवसेना लढण्याची तयारी करत आहे. त्याबाबत दोन महिन्यात मुख्यमंत्री शिंदे दौरा करणार आहेत. लोकसभानिहाय महायुतीचे मेळावे होतील. तेथील विकासकामांवर भर देणार आहे. पक्ष बांधणीच्या दृष्टीतून दौरे केले जातील, असे राहुल शेवाळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मात्र, आता या मुद्द्यावरून शिंदे गटांतील आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचे शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. “आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभेला 22 जागांवर दावा करणार का? असा प्रश्न विचारल्यावर कीर्तिकरांनी म्हटलं की, “दावा करण्याची गरज नाही. 22 जागा शिवसेनेच्या आहेतच. 2019 साली भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली होती. तेव्हा भाजपाला 26 आणि शिवसेनेला २२ जागा देण्यात आल्या. 26 पैकी भाजपाचे 23 खासदार, तर शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते.”