सेना-वंचित युतीमुळे आघाडीत बिघाड? जयंत पाटलांकडून शिवसेनेला अल्टिमेटम

उद्धव ठाकरे जेवढ्या लवकर निर्णय जाहीर करतील तेवढं चांगलं होईल,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.

मुंबई – शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याने महाविकास आघाडीतील धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. शरद पवारांशी राजकीय मतभेद असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत उद्धव ठाकरेंनी युती केल्याने राज्याच्या राजकारणातील नवा अध्याय सुरू झाला आहे. दरम्यान, या युतीवरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेला अल्टिमेटम दिला आहे. निवडणुकीबाबत महाविकास आघाडीसंदर्भातील निर्णय़ लवकरात लवकर जाहीर करण्याचे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – शरद पवार आजही भाजपसोबतच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

शिवसेना आणि वंचितच्या युतीमुळे महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे. येत्या निवडणुकीत जागावाटप कसे असेल याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपात वंचितलाही जागा मिळणार का असा प्रशअन उपस्थित केला जातोय. यावरून जयंत पाटलांनी शिवसेनेला तंबी दिली आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीबाबतचा महाविकासआघाडीसंदर्भातला निर्णय लवकर जाहीर करावा. आपण लवकर बसून ठरवू. उद्धव ठाकरे जेवढ्या लवकर निर्णय जाहीर करतील तेवढं चांगलं होईल,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले की, ‘संघटितपणे काम करायचं ही आमची भूमिका आहे. सगळ्यांना बरोबर घेणं हा आमचा सकारात्मक दृष्टीकोन आहे. फक्त येणाऱ्यांचं लवकर ठरलं तर बरं होईल. अनेकजण ऐनवेळी आमचं-यांचं पटलं नाही म्हणून आम्ही स्वतंत्र उभे राहिलो हे दाखवतात. त्यातून बरीच मतं बाजूला काढण्याचं काम होतं, ज्यामुळे भाजपचा फायदा होतो’, अशी भीतीही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.

जयंत पाटलांनी शिवसेनेला अल्टिमेटम देतानाच त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरही भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता, त्याअनुषंगाने शरद पवारांची ती खेळी असू शकते. राष्ट्रवादी फुटली नाही, शिवसेनेचेच आमदार सोडून गेले. राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवेसनेला साथ दिली हे नाकारता येणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.