Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पालकमंत्री भुजबळांच्या आदेशाला मालेगाव आयुक्त कासारांनी दाखवली केराची टोपली

पालकमंत्री भुजबळांच्या आदेशाला मालेगाव आयुक्त कासारांनी दाखवली केराची टोपली

महापालिकेला सोमवारी मारली दांडी; बदलीसाठी राजकीय पदाधिकार्‍यांकडे फिल्डींग लावल्याची चर्चा

Related Story

- Advertisement -

मालेगाव महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त त्र्यंबक कासार यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला खरा; मात्र पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कासार यांना मालेगाव न सोडण्याचे स्पष्ट आदेश दिले. असे असतानाही कासार हे सोमवारी (दि. २९) मालेगाव महापालिकेत रुजू झाले नाहीत. त्यामुळे कासार यांच्या एकूण भूमिकेवरच संशय व्यक्त होत आहे.

सर्वच विरोधकांनी साथ दिल्याने सत्ताधारी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांच्याविरुद्ध आणलेला अविश्वास ठराव गेल्या गुरुवारी (दि. २५) झालेल्या विशेष ऑनलाइन महासभेत दणक्यात मंजूर झाला. सभेस उपस्थित सर्व ८० सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने आयुक्तांवर नामुष्कीची वेळ आली. आयुक्तांवर अविश्वास मंजूर होण्याची महापालिकेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. या ठरावानंतर शुक्रवारी (दि. २६) कासार यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत घडला प्रकार सांगितला. मात्र भुजबळ यांनी कासारांची कानउपटणी करीत शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत मालेगाव महापालिकेतच कार्यरत राहण्याचे सूचित केले. कोरोनाच्या संवेदनशील काळात कासारांना मालेगाव सोडता येणार नाही, असेही त्यांनी बजावले. त्यामुळे सोमवारी (दि. २२) कासारांनी मालेगाव महासभेत रुजू होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात ते रुजू झालेच नाहीत. त्यामुळे भुजबळ यांच्या आदेशालाही कासारांनी केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वीच कासारांनी रजा घेतली होती. परंतु कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे कासारांना रजा घेता येणार नाही असे बजावत भुजबळ यांनी कासारांची रजा रद्द केली होती.

कासारांच्या भुजांमध्ये बळ देणारे कोण?
कासार यांना आता मालेगावात काम करण्याची इच्छा नसल्याचे त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय कारणास्तव आपण बदलीच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यासाठी त्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांचीही भेट घेतली. आता पुन्हा एकदा कासारांनी बदलीसाठी राजकीय पुढार्‍यांकडे खेटा मारणे सुरु केले असल्याचे समजते. मंत्र्यांच्या पातळीवर ‘डाळ शिजत’ नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एका मंत्र्याच्या पुतण्याशीही ‘मिटींग’ केल्याची चर्चा आहे. कासारांच्या ‘भुजांमध्ये बळ’ देण्याचा काम कोणाकडून होत आहे याचीही चर्चा आता मालेगावातील राजकीय वर्तुळात झडत आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -