गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेतील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून होणाऱ्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसंच, एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर यांनी यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली. (Disqualification hearings in coming weeks Eknath Shinde Uddhav Thackeray will call for hearing Rahul Narvekar )
दिल्ली दौरा पूर्वनियोजित
राहुल नार्वेकर हे गुरुवारी दिल्लीला रवाना झाले होते, यावरून चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्लीचा दौरा हा पूर्वनियोजित होता. तसंच, या दौऱ्यादरम्यान कायदेतज्ज्ञांची भेट घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. अपात्रतेसंदर्भात ज्या काही याचिका आल्या आहेत, त्या याचिकांवर चर्चा झाली. अपात्रतेसंदर्भात कसे नियम लागू होतात,याची माहिती घेतली. तसंच, अपात्रतेसंदर्भात नियम सतत बदलत असतात. परिस्थितीनुसार या नियमांमध्ये बदल होतो म्हणूनच कायदेतज्ज्ञांना भेटून चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलं.
शिंदे आणि ठाकरेंना बोलवणार?
राहुल नार्वेकर म्हणाले की, येत्या आठवड्यात अपात्रतेसंर्भात सुनावणी घेतली जाणार आहे. तशीही ही सुनावणी वेळापत्रकानुसार घेतली जाणार होती. परंतु आता माननीय न्यायालयानेही तसे निर्देश दिले आहेत. या सुनावणीत प्रोसिजरल बाबी तपासल्या जातील, असंही नार्वेकरांनी सांगितलं. तसंच, गरज पडली तर शिंदे आणि ठाकरेंनाही बोलवलं जाणार आहे.
नार्वेकर म्हणाले की, या प्रकरणात मी अधिक बोलणार नाही. कारण याबाबत सुनावणी घेऊन मलाच निर्णय द्यायचा आहे. तसंच, संविधानाने न्यायपालिका, कायदेमंडळ स्वतंत्र निर्माण केलं आहे. त्याच चौकटीत राहून सर्वोच्च न्यायालयानं मला निर्देश दिले आहेत. इतकचं नाही तर त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं की हा निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, सगळा कायद्याचा अभ्यास करूनच निर्णय दिला जाईल, असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
(हेही वाचा: ज्यांना सरकार चालवता येत नाही, असे घटनाबाह्य मुख्यमंत्री; आदित्य ठाकरेंचा घणाघात )