घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रप्रतिज्ञापत्रांनंतरही नाशिकमधील शिवसैनिकांची अस्वस्थता

प्रतिज्ञापत्रांनंतरही नाशिकमधील शिवसैनिकांची अस्वस्थता

Subscribe

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर नाशिकच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकार्‍यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शंभर रुपयांची प्रतिज्ञापत्रे जमा केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र काही माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे कळते. निवडणुकीचे चिन्हदेखील सध्या न्यायालयीन लढ्यात अडकले असल्याने बहुतांश नगरसेवक नेमके कुठे जावे या संभ्रमात आहेत. त्याचा थेट परिणाम उद्धव ठाकरे यांच्या ६१ व्या वाढदिवसावर झालेला दिसतो. एरवी ठाकरे यांचा वाढदिवस नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदा मात्र कमालीचा निरुत्साह जाणवत आहे.

गेल्या रविवारी नाशिकमधील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. यावेळी उपस्थितांनी उद्धव ठाकरेंप्रती आपली निष्ठा व्यक्त करत तशी प्रतिज्ञापत्रेही जमा केली. मात्र, त्यानंतर काही दिवसांनंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता दिसत आहे. यावर उघडपणे कुणी बोलायला तयार नसले तरी ‘खासदार हेमंत गोडसे यांनी काय चुकीचे केले?’ असा प्रश्न कानगोष्टींमध्ये विचारला जात आहे. शिवसेनेवर अधिकार नक्की कुणाचा, धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कोणत्या गटाला मिळणार याबाबत कायदेशीर लढा सध्या सुरु आहे. महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने ज्या बाजूने पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह असेल त्याबाजूने झुकण्याचे नियोजनही काही माजी नगरसेवकांनी केल्याचे समजते.

- Advertisement -

त्यामुळे तूर्तास कोणाच्याही बाजूने जाहीरपणे मत व्यक्त करणे टाळले जात आहे. या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ भूमिकेचा परिणाम म्हणजे मातोश्रीवरुन परतल्यानंतर माजी नगरसेवक अचानकपणे ‘म्यूट’ झाले आहेत. बुधवारी साजर्‍या होणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाबाबतही स्थानिक पदाधिकार्‍यांशी मोठ्या नेत्यांनी संपर्क केलेला नाही. इतकेच नाही तर काही बड्या नेत्यांनी वाढदिवसाच्या आदल्या दिवशी दिवसभर मोबाईल बंद करुन ठेवले होते. एरवी वाढदिवसाच्या दिवशी नाशिक शुभेच्छा फलकांनी सजून जात असायचे. यंदा मात्र तुरळक ठिकाणी होर्डिंग्ज लागलेले दिसत आहेत. होर्डिंग लावावे की नाही याविषयीचे स्पष्ट आदेशही कार्यकर्त्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे कार्यकर्तेेदेखील संभ्रमात आहेत. शिवाय वाढदिवसानिमित्त घेण्यात येणार्‍या सामाजिक कार्यक्रमांतही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -