महागाईचे विघ्न; पूजा साहित्याचीही २५ टक्क्यांनी दरवाढ

नाशिक : दोन वर्षानंतर यंदा निर्बंधमुक्त गणशोत्सव साजरा करण्यात येणार असला तरीही या उत्सवात यंदा महागाईचे विघ्न निर्माण झाले आहे. यंदा गणेशमूर्तींच्या किंमतीत वाढ झाली असतानाच त्यापाठोपाठ गणेश आराधनेसाठी लागणार्‍या पूजा साहित्याच्या दरातही 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गणेशभक्तांचे बजेट तर कोलमडणारच आहे, शिवाय त्यांचा हिरमोडदेखील होणार आहे.

यंदा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन मंडळांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे गणपती मूर्तींपासून तर पूजेच्या साहित्यांनी बाजारापेठा सजल्या आहेत. आकर्षक आणि सुबक गणेश मूर्तींचे बाजारपेठेत आगमन झाले आहे. त्यासोबतच मखर, सजावटीचे साहित्य, रोषणाई, पूजा साहित्यात कापूर, उद, अगरबत्ती, वाती, फुलवाती, विद्युतमाळा, पाट, चौरंग आणि इतर साहित्याची दुकाने आता चौकात-चौकात थाटली जात आहेत. यंदा जल्लोषात श्रींचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्तही सज्ज झाले आहेत. पण त्यांच्या आनंदावर महागाई पाणी फेरणार आहे. कापरचा दर पाव किलोमागे 150 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे किलोच्या दरात मिळणारा कापूर यंदा त्याच भावात एक पाव नेता येणार आहे. गेल्यावर्षी एक किलो कापूर 750 ते 800 रुपये दराने मिळत होता. यंदा एक किलो कापरासाठी भाविकांना 2000 रुपये मोजावे लागणार आहेत.

कापरावर 18 टक्के जीएसटी लावल्याने भाव वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. अगरबत्तीच्या दरातही वाढ झाली आहे. अगरबत्तीचे दर 500 रुपयांवरुन 1000 रुपये किलो झाले आहेत. अगरबत्तीवर 12 टक्के जीएसटी लागू होतो. गेल्या वर्षी अगरबत्तीचा पुडा 300 ते 400 रुपयांना मिळत होता. यंदा तो 500 ते 600 रुपयांना मिळत आहे. वातीचे पाकीट यंदा 10 रुपयांपेक्षा जास्त किंमतीला मिळू शकते. तर गणेशवस्त्र आणि इतर वस्तूंच्या किंमतींसाठी ही भक्तांना जादा रक्कम मोजावी लागणार आहे. गणेश मूर्ती महाग असली तरी विधिवत पूजेसाठी मूर्ती लागते. दुसरीकडे पूजेचे साहित्य ही गरजेचे असल्याने गणेशभक्त खर्चात कुठे कपात करावी या विचारात सापडले आहेत.