घरताज्या घडामोडीCycloneNisarga : नुकसानग्रस्तांना उद्यापासून रॉकेल, तांदूळ आणि गव्हाचे वाटप - शरद पवार

CycloneNisarga : नुकसानग्रस्तांना उद्यापासून रॉकेल, तांदूळ आणि गव्हाचे वाटप – शरद पवार

Subscribe

हिंमत दाखवली, योग्य नियोजन केले, आणि मदत मिळाली तर आपण पुन्हा उभे राहू शकतो, असे सांगत पवारांनी नुकसान ग्रस्त कोकणवासीयांना धीर दिला.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात तडाखा बसलेल्या काही भागांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पाहणी केली. आणि कोकणवासीयांना धीर दिला. हिंमत दाखवली, योग्य नियोजन केले, आणि मदत मिळाली तर आपण पुन्हा उभे राहू शकतो, असे सांगत पवारांनी नुकसान ग्रस्त कोकणवासीयांना धीर दिला. तसेच नुकसानग्रस्तांना उद्यापासून रॉकेल, तांदूळ आणि गव्हाचे वाटप करण्यात येणार असल्याचेही पवारांनी सांगितले.

शरद पवार हे कोकणच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहे. आज त्यांनी म्हसळा, माणगाव, दिवे आगार आणि श्रीवर्धन येथील निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पडलेली घरे, प्रार्थना स्थळे, मंदिर, मशिदी, शेती, बागा आदींची पवारांनी पाहणी केली. पवारांनी स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा ही जाणून घेतल्या. स्थानिकांनी पवारांसमोर त्यांच्या अडचणी सांगितल्या. आमच्या घराची कौल उडाली. पत्रे उडाले. पिण्याचे पाणी नाही, वीज नाही, शेती जमीनदोस्त झाली. नारळाची झाडे पडली. घरांची पडझड झाली. घरांची डागडुजी करायची तर पैसे नाहीत. बँका बंद आहेत. राष्ट्रीय बँका बंद आहेत. बँकेत जाण्यासाठी महाडला जावे लागते. तिथपर्यंत जाण्यासाठी पैसे नाहीत, अशी व्यथा कोकणवासीयांना पवारांसमोर मांडली. यावेळी, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरेही उपस्थित होते. यावेळी पवारांनी हिंमत दाखवली की आपण पुन्हा उभे राहू, असं सांगत स्थानिकांना धीर दिला.

- Advertisement -

दरम्यान, पवारांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले होते. निसर्ग वादळामुळे या सर्वांच धान्य भिजून गेले आहे. त्या सर्वांना नव्याने धान्य देत येईल, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतील कामं देण्यात येतील. तसेच भात शेतीचे नुकसान झालेल्यांना लागेल ती मदत देऊ असे सांगतानाच उद्यापासून नुकसानग्रस्तांना गहू, तांदूळ आणि रॉकेलच वितरण करण्यात येणार आहे, असं पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -