कसबा पेठ पोटनिवडणुकीत होतेय पैसेवाटप; रवींद्र धंगेकरांचे आज उपोषण

कसबा पेठ मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप आणि पोलिसांविरोधात पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. याविरोधात आज रवींद्र धंगेकर हे उपोषण करणार आहेत.

Ravindra Dhangekar

रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या मतदान पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांत या निवडणुकींची सर्वाधिक चर्चा झालेली पाहायला मिळाली. पण या निवडणुकीतील कसबा पेठ मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप आणि पोलिसांविरोधात पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. याविरोधात आज रवींद्र धंगेकर हे उपोषण करणार आहेत.

कसबा पेठ विधानसभेच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये रविवारी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी (ता. २४ फेब्रुवारी) थंडावल्या. पण यानंतर मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराकडून पोलिसांच्या साथीने पैसे वाटप करण्यात आले आहे, असा आरोप काँग्रेसचे कसबा पेठ मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. याविरोधात आज रवींद्र धंगेकर हे कसबा पेठ येथील गणपती मंदिरासमोर उपोषण करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. यानंतर भाजपने कसबा पेठ मतदारसंघातील रविवार पेठ, गंज पेठ आणि इतर भागात पैसे वाटप करण्यास सुरुवात केली. यामध्ये पोलीस देखील सहभागी असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे याविरोधात आज कसबा गणपतीसमोर उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता धंगेकर हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक देखील उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा – केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या वाहनांचा अपघात, १४ जणांचा मृत्यू

रविवारी पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार असे बोलले जात आहे. कसबा पेठ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे तर भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियातील कोणत्याही सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. चिंचवड मतदारसंघात राष्ट्रवादीचे नाना काटे विरुद्ध भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप असा सामना होणार आहे.