घरमहाराष्ट्रजिल्हा परिषदेचे वरातीमागून घोडे

जिल्हा परिषदेचे वरातीमागून घोडे

Subscribe

अनधिकृत शाळांची यादी जाहीर, प्रवेश न घेण्याचे आवाहन

अनधिकृत शाळांची यादी नुकतीच जाहीर करून, त्यात प्रवेश न घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष सुरु होवून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आल्यामुळे जिल्हापरिषदेने वरातीमागून घोडे धाडल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यात एकूण १९९ अनधिकृत शाळा असल्याची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १२ जूनला जाहीर केली. या यादीत शाळेचे नाव, पत्ता, इयत्ता जाहीर करून त्यात प्रवेश घेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा १८ जूनला शाळा सुरु होणार आहेत. मात्र, या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुर्ण होवून, आपापल्या इयत्तेनुसार विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके, गणवेष आणि शालेय वस्तुंची खरेदीही केली आहे. प्रवेशाच्या वेळी लागणारी ङ्खी आणि इतर बाबीही पुर्ण करण्यात आल्या आहेत. आता १८ तारखेला फक्त श्रीगणेशा करणे बाकी रहिले आहे.

त्यामुळे जून महिन्यात अनधिकृत शाळांची यादी जाहीर करून शिक्षण विभागाने या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले आहे. अनधिकृत शाळांची माहिती वर्षानुवर्षे शिक्षण विभागाकडे असतानाही, त्यावर कारवाई करणे किंवा प्रवेश प्रकियेच्या अगोदर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्याची तसदी या विभागाकडून घेतली जात नाही. याउलट जूनमध्ये यादी जाहीर करून आपले कर्तव्य पार पाडल्याची भुमिका शिक्षण खात्याकडून घेतली जात आहे. त्यामुळे प्रवेश घेतल्यानंतर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करून वरातीमागून घोडे धाडल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान,१९९ अनधिकृत शाळांमघ्ये १६० शाळा एकट्या वसई तालु्क्यात आहेत. तर पालघरमध्ये १६, वाडा तालु्क्यात ९, विक्रमगडमध्ये ४ आणि तलासरी, डहाणू, मोखाड्यात ३-३ शाळा अनधिकृत आहेत. याप्रकरणी शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता, आम्हाला शिक्षण खात्याकडून यादी मिळाल्यानंतर ती जाहीर केल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -