घरमहाराष्ट्रदिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर: सोन्याच्या मुखवट्याचा तिढा सुटला, काय आहे प्रकरण? मंदिराचा...

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर: सोन्याच्या मुखवट्याचा तिढा सुटला, काय आहे प्रकरण? मंदिराचा इतिहास काय?

Subscribe

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्ण गणपती मंदिरातील सोन्याची मूर्ती चोरीला गेल्याच्या घटनेला नुकतीच १० वर्षे झाली. या सुवर्ण गणपती मंदिरातून सोन्याचा मुखवटा चोरीला गेला होता. यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा मंदिर चोरी झाल्याने सारेचं चकित झाले. दरोडेखोरांनी चोरी केलेला गणपतीचा सोन्याचा मुखवटा चोरून विकला. परंतु पोलिसांनी या प्रकणाचा छडा लावेपर्यंत मुखवट्याचे सोनं वितळवून झाले होते. यानंतर पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध घेत वितळलेलं सोन हस्तगत केले होते. मात्र हस्तगत केलेले सोने कायद्याच्या कचाट्यात सापडले. परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता १० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सुवर्ण गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण मुखवट्याचे सोने राज्य सरकारकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाला दिले आहेत.

दिवेआगारातील या सुवर्ण गणपती मंदिरात २४ मार्च २०१२ साली चोरीची घटना घडली होती. दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांची हत्या करून मंदिरातील सुवर्ण मूर्ती आणि सोने पळवून नेले होते. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दरोडेखोरांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून वितळवलेलं 1 किलो 361 ग्रॅम सोनं हस्तगत केलं होतं. या प्रकरणी 5 आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर 2 सोनारांना 9 वर्षे आणि 3 महिलांना 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

दिवेआगार सुवर्णगणेश मूर्ती मुखवट्या मागचा इतिहास 

कोकणातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार हे अतिप्राचीन, निसर्गरमणीय गाव आहे. निळाशार अथांग समुद्र, गर्द माडीची बने, नारळा सुपारीच्या झावळ्यामध्ये लपवेली टुमकदार कौलारु घरांसह, दिसणारे बंगले… असा रमणीय निसर्ग दिवेआगर गावाला लाभला आहे. गेल्या दहा वर्षापासून या गावाला प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे स्वरुप प्राप्त झालंय, ते तिथे सापडलेल्या सोन्याच्या गणपतीमुळे. सुवर्णगणेश इतिहास खूपच आकर्षक आहे. ७ नोव्हेंबर १९९८ साली या मंदिराजवळील नारळाच्या बागेतील जमिनीखाली एक तांब्याची पेटी सापडली होती. या पेटीत सोन्याची रत्नजडीत एक सोन्याची गणपतीची मूर्ती तसेच गणपतीचे दागिने आढळून होते. या सुवर्णगणेश मूर्तीचे वजन सुमारे १ किलोपेक्षा अधिक होते. इतिहासकरांच्या मते, सुवर्णगणेश मूर्ती अंदाजे ३०० ते ४०० वर्षे प्राचीन आहे. परंतु आजही ही सोन्याच्या मूर्ती आणि दागिन्यांच्या इतिहासाबद्ल अनेक तर्कवितर्क लढवले जातात. १९९८ ते २०१२ सालापर्यंत ही मूर्ती दिवेआगार सुवर्ण मंदिरात स्थापित होती, मात्र २०१२ साली ती सुवर्णमूर्ती चोरीला गेला.

मात्र या मूर्तीमागे अनेक वर्षांचा इतिहास आहे. दिवेआगर सुवर्ण गणपती मंदिरातील मूळ गणपतीची मूर्ती पुरातन होती. यापूर्वी या मूर्तीची प्रतिष्ठापना अंदाजे 1865 सालादरम्यान करण्यात आल्याचे अंदाज व्यक्त केले जातात. या सुवर्ण गणपतीची मूर्ती सापडली तिथेच शके ९८२ चा दिवेआगर ताम्रपट सापडला होता. तो मराठीतला पहिला ताम्रपट मानला जातो. या ताम्रपटावर दिवे असा गावचा उल्लेख असून वेदविद्या पारंगत घैसास , देवल , मावलभट्ट आदी ब्राह्मण राहत होते. त्याकाळी सोन्याच्या नाण्यांचा वापर होता. त्यामुळे या गणपतीचा काळही एक हजार वर्षांपूर्वीचा ठरतो. दिवेआगरच्या सुवर्णगणेशाच्या दोन्ही कानांवर सोनचाफ्याच्या फुलाबरोबर पायरीचा आंबा कोरला होता. मूर्तीच्या मुखवट्यावरील व्याघ्रमुख पाहून ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची होती असे म्हंटले जाते. दरम्यान मंदारपट्टण बंदराजवळ कुडे-मांदाड येथे बौद्ध लेणी गुंफा आहेत. या ठिकाणी प्राचीन काळी मौर्य व नंतर शिलाहारांचं राज्य होतं. तसेच श्रीवर्धन तालुक्याच्या दक्षिणेस असलेल्या बाणकोट-दासगाव खाडीत पालीपट्टण नावाचं बंदर होतं. या बंदरातूनही परदेशात व्यापार चालत असे. या बंदराजवळही लेणी गुंफा आहेत. जवळ महाड हे मोठे व्यापारी केंद्र आहे.

- Advertisement -

परदेशाचा माल महाडला येई व देशातील माल महाड बंदरातून परदेशी जात होता. या व्यापारामुळे श्रीवर्धन तालुक्याला भरभराट आली. हे जसे वरदान होते , तसाच तो शापही होता. कारण याठिकाणी अरब आणि नंतर पोर्तुगीजांनी समुद्रहल्ले केले. यावेळी त्यांनी श्रीवर्धन तालुक्यातील संपत्तीची लूट केली. यामुळे पोर्तुगीजांपासून रक्षण व्हावे म्हणून सुमारे एक हजार वर्षांपूर्वी दिवेआगरची सुवर्णगणेशाची मूर्ती व सोन्याचे दागिने जमिनीत पुरून ठेवले असावे असा अंदाज बांधला जातो. आजही दिवेआगरात देवांच्या भग्न मूर्ती , तसेच पुष्करणी-शिलालेख , गंधेगाळ , क्षेत्रपाळ असे प्राचीन अवशेष आढळतात. सुवर्णगणेशाशिवाय दिवेआगार गावातील शिलाहार कालीन रूपनारायणाचं शिल्पही अप्रतिम आहे. या आगरात माघ शुद्ध चतुर्थीला श्रीगणेशाचा जन्मोत्सव आणि कार्तिक वद्य चतुर्थीला सुवर्णगणेशाचा जन्मदिवस उत्साहाने साजरा केला जातो. सिद्धनाथ , केदारनाथ यांच्या चित्र महिन्यात होणाऱ्या यात्रेमध्ये माणसाच्या पाठिला गल टोचून गरागरा फिरवले जाते. हां खेळ पाहाण्यासाठी मोठी गर्दी होते. दिवेआगरमध्ये रुपनारायाण ,उत्तरेश्वर ,पंचमुखी महादेव यांची मंदिरेही पाहण्याजोगी आहेत. मात्र २०२० रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्याच्या निसर्गाचे मोठे नुकसान झाले. येथील नारळी, फोफळीच्या बागा अक्षरश: कोलमडून पडल्या. आज हजारो श्रीवर्धनकर या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.


हेही वाचा- Covid-19 चा फटका : कोकणच्या राजा आंबा यंदा चवीला महागणार


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -