पुणे : दिवाळी सणाला सुरुवात झाली असून यानिमित्ताने प्रत्येकजण आपापल्या गावी जातो. गावी जाण्यासाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वी प्रत्येकजण तिकीट काढतो. पण ज्यांना तिकीट मिळत नाही, त्यांच्याकडे खासगी वाहनाने गावी जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. दिवाळी काळात गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या गोष्टीचा फायदा खासगी बस चालक उठवताना दिसतात. त्यामुळे सध्या खासगी बसचे दर विमान प्रवासापेक्षाही जास्त असल्याचे समोर येत आहे. यामुळे खासगी बस चालकांचे चांगभलं होत असलं तरी सर्वसामान्यांचे मात्र दिवाळे निघाले आहेत. (Diwali 2023 Diwali of common people going to village Air travel is cheaper than private bus)
हेही वाचा – Pune: पुणेकरांना दिवाळी भेट! गडकरींकडून 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांची घोषणा
पुणे-जळगाव मार्गावर दुप्पट ते तिप्पट भाडेवाढ
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीचा सण असल्यामुळे पुण्यावरुन गावी जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त असलेल्या तिकीट दर दुप्पटीपेक्षा जास्त वाढले आहेत. त्यामुळे पुणे ते जळगाव प्रवास तिकीटदर 400 ते 900 रुपयांवरून थेट 2 हजार ते 2 हजार 500 रुपयांपर्यंत पोचले आहेत. मात्र या काळात गावावरुन पुण्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या कमी असल्यामुळे तिकीट दर कमी आकारले जात आहेत. सध्या जळगाव ते पुणे तिकीट दर फक्त 400 रुपये आहे. याशिवाय पुणे ते नागपूर तिकीट दर 3500 ते 4000 रुपये आणि नागपूर ते पुणे तिकीट दर 600 ते 700 रुपये आहे.
ट्रॅव्हल्स लॉबीपुढे परिवहन विभागही लाचर
पुणे ते जळगाव प्रवासात थेट नागपूरपासून ते धुळ्यापर्यंत जवळपास चारशेच्यावर बसेस ये-जा करतता. या मार्गावर बस वाहतूकदारांची लॉबी सक्रिय आहे. या लॉबीतील सर्वांनी मिळून दिवाळी काळात मोठी दरवाढ केली आहे. खासगी बस मालक मनमानी पद्धतीने कारभार करत आहे. राज्य परिवहन महामंडळाने ज्याप्रमाणे दहा टक्के दरवाढ केली आहे, त्यापद्धतीने कोणतीही मर्यादा खासगी वाहतूकदारांना नाही. तसेच परिवहन विभागाकडून यासंदर्भात काहीच पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स लॉबीपुढे राज्यातील परिवहन विभागही लाचर असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा – Breaking : डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी; ललित पाटील प्रकरण आलं अंगलट?
बसपेक्षा विमानप्रवास स्वस्त
पुणे येथून जळगाव किंवा नागपूरला जाण्यासाठी रेल्वेचे प्रमाण कमी आहे. तसेच पुणे ते जळगाव विमानसेवा नाही. दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्याने याचा फायदा खासगी बस वाहतूकदार घेत आहेत. सध्या जळगाव ते मुंबई विमानसेवेचे तिकीट दर 2500 रुपये आहे. त्यामुळे खासगी बसपेक्षा विमानप्रवास स्वस्त असेच चित्र आहे.