Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र मुंबई महापालिका कर्मचार्‍यांना 20 हजार रुपये दिवाळी बोनस!

मुंबई महापालिका कर्मचार्‍यांना 20 हजार रुपये दिवाळी बोनस!

Subscribe

मुंबई : राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेतील ठाकरे व शिंदे गटांचा संघर्ष न्यायालयाबरोबरच रस्त्यावरही सुरू आहे. तर, दुसरीकडे मुंबई महापालिकेतील एक लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचे वेध लागले आहेत. त्याअनुषंगाने पालिकेने कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपयांचा बोनस देण्याचे आश्वासन दिले आहे.

पालिका आयुक्त इकबालसिंह चहल व कामगार संघटनांचे नेते यांच्यात बुधवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठीकत कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये बोनस देण्याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले, अशी माहिती पालिकेतील कामगार संघटनांच्या समन्वय समितीतर्फे कामगार नेते बाबा कदम यांनी दिली. यावेळी पालिकेतील विविध कामगार संघटनांद्वारे स्थापन केलेल्या समन्वय समितीचे अ‍ॅड. महाबळ शेट्टी, वामन कवीस्कर, सत्यवान जावकर, अ‍ॅड. प्रकाश देवदास, पा.शी. साळवी, दिवाकर दळवी, संजीवन पवार, के.पी. नाईक, साईनाथ राज्याध्यक्ष, के.के. सिंह यांच्यासह कामगार संघटनांचे अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisement -

गतवर्षीसुद्धा पालिका कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये इतकाच दिवाळी बोनस देण्यात आला होता. पालिकेच्या सुमारे 1 लाख 2 हजार कर्मचार्‍यांना यंदाही 20 हजार रुपयांचा बोनसचा लाभ मिळणार आहे. तर या बोनस वाटपामुळे पालिकेच्या तिजोरीवर तब्बल 204 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर

- Advertisement -

वास्तविक पालिका कामगारांना यंदा मागील वर्षीच्या बोनस रकमेत काहीशी वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र पालिका प्रशासनाने गतवर्षीप्रमाणे यंदाही 20 हजार रुपये इतकाच बोनस देण्याची तयारी दर्शवली असून तसे आश्वासन आयुक्तांनी कामगार नेत्यांना दिल्याचे सांगण्यात आले.

रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस
यंदा रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जवळपास 11.56 लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल. यात आरपीएफ आणि आरपीएसएफ कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. या बोनसमुळे देशाच्या तिजोरीवर जवळपास 2000 कोटी रुपयांचा बोजा पडेल. 2021मध्ये देखील या रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला होता.

हेही वाचा – मोठी बातमी! शिंदे गटातील 6 जणांचे भवितव्यही सर्वोच्च न्यायालयाच्या हाती

- Advertisment -