दिवाळीच्या सुट्टीचा गोंधळ, शिक्षण विभाग व शिक्षण निरीक्षक कार्यालयाचे परिपत्रक भिन्न

Diwali holiday misunderstanding circulars of the education department and the education inspector's office are different
दिवाळीच्या सुट्टीचा गोंधळ, शिक्षण विभाग व शिक्षण निरीक्षक कार्यालयाचे परिपत्रक भिन्न

शिक्षक निरीक्षक कार्यालयाने १ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र परिपत्रक काढून २८ ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी जाहीर केली. पहिल्यांदा २० दिवसांची जाहीर झालेली सुट्टी शालेय शिक्षण विभागाने १४ दिवसांपर्यंत कमी केली आहे. दिवाळीच्या सुट्टीसंदर्भात शिक्षण विभागाने घातलेल्या गोंधळामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सुट्टी कमी झालेल्या पालक व शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

दिवाळीसाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक (उत्तर, पश्चिम, दक्षिण) कार्यालयाने १ ते २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली होती. या सुट्टीच्या कालावधीमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही प्रकारचे वर्ग बंद असणार आहेत. त्यामुळे शाळांनी परीक्षांचे नियोजन करत ३० ऑक्टोबरपर्यंत सत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना सुट्टीची सूचना दिली. मात्र, ऐनवेळी २७ ऑक्टोबरला शालेय शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्टीत २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर असा बदल केला. शिक्षण विभागाने ऐनवेळी दिवाळीच्या सुट्टीबदल घातलेल्या गोंधळामुळे शाळांतील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडणार आहे.

२८ ऑक्टोबरपासूनची सुट्टी एक दिवस अगोदर जाहीर झाल्याने ऐनवेळी परीक्षा स्थगित करणे अशक्य असल्याचे मत शाळांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच दिवाळीच्या सुट्टीनंतर परीक्षा घेतल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच दुसर्‍या सत्रातील अभ्यास शिकवण्यासाठी कमी कालावधी मिळणार असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रावर होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीची सुट्टी २० दिवसांवरून १४ दिवसांपर्यंत कमी केल्याने विद्यार्थी व पालकांच्या मूळगावी जाण्याच्या नियोजनाचेही तीनतेरा वाजण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाच्या गोंधळाचा फटका विद्यार्थी, शिक्षक व पालकांना बसणार असल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे