गड-किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना आता ६ महिने कैद

drink on fort
गड-किल्ल्यावर दारू पिणाऱ्यांना चाप

महाराष्ट्रातील गड किल्ले हे आपल्या इतिहासातील पराक्रमाचे प्रतिक आहे. ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या गड-किल्ल्यांवर काही हुल्लडबाज दारू पिऊन पावित्र्य भंग करत असतात. अशा टवाळखोरांना अनेकदा स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमी चोपही देत असतात. मात्र आता राज्याच्या गृहविभागाने गड-किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जबरदस्त निर्णय घेतला आहे. यापुढे गड-किल्ल्यांवर मद्यपान करुन गोंधळ घातल्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यात साडे तीनशेहून अधिक गडकिल्ले आहेत. जगभरातील शिवप्रेमींसाठी हे किल्ले प्रेरणास्थळ आहेत. मात्र काही टवाळखोर तरुण गड-किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालतात. यामुळे इतर पर्यटकांना त्रास तर होतोच, तसेच गड-किल्ल्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य पसरते. गड-किल्ल्यांवरील असे प्रकार बंद झाले पाहीजेत, यासाठी आजवर अनेकांनी प्रयत्न केले होते. त्यावर आता गृहविभागाने कारवाई केली आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५ मध्ये बदल करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाची माहिती लवकरच गडकिल्ले आणि पुरातन वास्तूंच्या जवळ फलकाच्या माध्यमातून लावली जाणार आहे.