Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र डॉक्टरने अख्खे कुटुंबच संपवले !

डॉक्टरने अख्खे कुटुंबच संपवले !

कर्जत तालुक्यातील राशिन येथील घटना : चौघांचा मृत्यू, मोठ्या मुलाला ऐकू येत नसल्याने टोकाचा निर्णय

Related Story

- Advertisement -

कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर महेंद्र थोरात (वय 46) यांनी स्वत:सह पत्नी व दोन मुलांची जीवनयात्रा संपवण्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आल्याने अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. महेंद्र थोरात यांनी दरवाजाला चिठ्ठी चिटकवली होती. या चिठ्ठीत म्हटले आहे की, माझा थोरला मुलगा कृष्णा ( वय 18) याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे आम्ही वडील व आई म्हणून दु:ख सहन करू शकत नाही. म्हणून मी व माझी पत्नी वर्षा (वय 39) आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत. हे योग्य नसले तरी नाईलाजास्तव हे कृत्य करीत आहे. यात कोणालाही जबाबदार धरू नये, असा या चिठ्ठीत उल्लेख केला आहे. डॉ. थोरात यांचा धाकटा मुलगा कैवल्य हा आठ वर्षांचा होता. तोही या घटनेत मयत झाला आहे.

डॉ. महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी व दोन लहान मुलांना गळफास देत स्वत:ही गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवण्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी डॉक्टर थोरात हे नेहमीप्रमाणे दवाखान्यात का आले नाहीत म्हणून कंपाऊंडर व पेशंटनी त्यांना अनेक फोन केले. त्यांनी फोन उचलले नाहीत. काही लोक व दवाखान्यातील कर्मचारी जेव्हा घरी गेले तेव्हा घर आतून बंद असल्याचे दिसले. अनेक आवाज देऊनही घर उघडले गेले नाही. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दरवाजा उघडताच थरकाप उडवणारी घटना समोर आली. डॉक्टर थोरात त्यांची पत्नी व दोन मुले असे चार मृतदेह घरात आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनेची माहिती समजताच शेकडो नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी आत्महत्या की घातपात? याबाबत उलटसुलट चर्चा जनतेतून चर्चिली जाऊ लागली आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेत वेगाने तपास सुरू केला आहे. दरम्यान, उच्चशिक्षित डॉक्टरने संपूर्ण कुटुंबच संपवण्याची घटना घडल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे.

- Advertisement -