तलाठ्यांच्या दप्तराचं इन्स्पेक्शन; २ हजारांवर तलाठी कार्यालयांचा समावेश

तीन महिन्यांत झाडाझडती करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

Talathi Office Documents

नाशिक विभागांतर्गत ५ जिल्ह्यातील २ हजारांहून अधिक तलाठ्यांच्या दप्तराची पडताळणी होणार आहे. त्यांच्या कार्यालयातल्या या कागदपत्रांची झाडाझडती तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेत. महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता यावी, यासाठी विभागीय आयुक्तांनी हे पाऊल उचललंय.

प्रशासनासाठी महत्त्वाचा भाग असलेला महसूल विभाग हा जमिनींशी संबंधित कागदपत्रांमुळे नागरिकांच्या अधिक जवळचा असतो. ही कागदपत्रं अपडेट करण्याची जबाबदारी तलाठ्यांची असते आणि त्यामुळेच तलाठी कार्यालयांशी सर्वसामान्यांचा अधिक संबंध येत असतो. ७/१२ उतारा, फेरफार नोंदी, इनाम आणि वतनाच्या जमिनींच्या नोंदी यांसारख्या बाबी तलाठ्यांच्या हाती असल्यानं अनेक ठिकाणी गैरप्रकार घडल्याचंही पुढे आलंय. त्यामुळेच त्यांच्या दप्तरांची नियमित आणि वेळेवर तपासणी झाल्यास स्थानिक पातळीवर उद्भवणारे प्रश्न सुटतील आणि न्यायालयीन दावेही कमी होण्यास मदत होऊ शकेल.

तपासणीसाठी दिली कालमर्यादा

नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या पाच जिल्हयात २ हजार ६३ तलाठी कार्यालये आहेत. त्यात नंदुरबारमध्ये २२२, धुळ्यात २२५, जळगावात ५०१, नाशिकमध्ये ५३२, तर अहमदनगर जिल्ह्यात ५८३ तलाठी कार्यरत आहेत. या सर्व कार्यालयांच्या कागदपत्रांची पुढील ३ महिन्यांत तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आलेत.

लवकरच येणार अॅप्लिकेशन

तलाठी कार्यालयांमधील कारभार आणि त्यातील कागदपत्रांची संपूर्ण माहिती ही एकतर ऑनलाईन नसते आणि ऑनलाईन असली तर ती अपडेट नसते. त्यामुळे अनेकदा एखादा गैरव्यवहार किंवा चूक लक्षात येईपर्यंत मोठा कालावधी लोटलेला असतो. ही बाब टाळण्यासाठी लवकरच स्वतंत्र अॅप्लिकेशन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दप्तर तपासणी आणि कामाचा नियमित आढावा जलदगतीने घेणं शक्य होणार आहे.