डोंबिवली : डोंबिवलीमधील देवीचा पाडा येथे एक दोन वर्षाचा मुलगा तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील बचावल्याचे समोर आले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सध्या चांगलाच व्हायरल होत असून सोशल मिडीयावर याची चांगलीच चर्चा होत आहे. यामध्ये दिसून येते की, दोन वर्षाचे बाळ तिसऱ्या मजल्यावरून खाली पडताना दिसत असताना एक व्यक्ती धावला आणि त्याने त्या बाळाला झेलण्याचा प्रयत्न केला. यामुळे बाळ बचावले असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. यावेळी सर्वांनाच ‘देव तारी त्याला कोण मारी’ याची प्रचीती झाली. (Dombivali 2 years boy fell from third floor survived Video of CCTV footage viral)
हेही वाचा : Ladki Bahin : प्रजासत्ताक दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाल्या आदिती तटकरे?
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात असलेल्या 13 मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षांचा मुलगा खाली पडल्याची घटना घडली. यावेळी तो खाली पडत असल्याचे या इमारतीत राहणाऱ्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणाच्या लक्षात आले. त्याने कसलीही पर्वा न करता त्या बाळाला वाचवण्यासाठी झेप घेतली. त्यामुळे भावेशच्या हातावरून हा मुलगा पायावर पडला. त्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. पण या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज बाहेर येताच भावेशच्या धाडसाचे चांगलेच कौतुक होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या मजल्यावरील एका घराचे काम सुरू होते. ग्रीलला असलेल्या काचा रंगरंगोटी सुरु असल्याने काढण्यात आल्या होत्या. त्याच वेळी खेळता खेळता दोन वर्षाचा चिमुकला गॅलरीमध्ये गेला आणि तो ग्रीलमधून खाली पडला. यावेळी महिलांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर खाली उभा असलेल्या भावेशचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यावेळी तो खाली पडत असल्याचे त्याला दिसले आणि चेंडूला पकडण्यासाठी गेल्याप्रमाणे धाव घेत या दोन वर्षाच्या मुलाला झेलण्याचा प्रयत्न केला. हातामधून हे बाळ त्याच्या हातातून निसटले आणि पायावर पडले. यामुळे त्याचा जीव तर वाचला पण त्याचा हात फॅक्चर झाला आहे. सध्या त्या लहान बाळाची तब्येत बरी असल्याची माहिती देण्यात आली आहे.