गणेशोत्सवात डीजेवर बंदी नको

गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची मागणी

नाशिक : दोन वर्षानंतर गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यामुळे प्रशासनाने अडवणुकीचे धोरण न अवलंबता तात्काळ सर्व परवानग्या द्याव्यात. गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावर निर्बंध घालू नयेत, स्मार्ट सिटीने खोदलेले रस्ते तात्काळ बुजवावेत, अशी मागणी नाशिक जिल्हा गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी केली.

३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा गणेशोत्सव महामंडळाची बैठक शनिवारी (दि.६) पार पडली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, माजी महापौर विनायक पांडे, माजी नगरसेवक गजानन शेलार, लक्ष्मण धोतरे, बबलू परदेशी, सत्यम खंडाळे, गणेश बर्वे, राजेंद्र बागूल, रामसिंग बावरी आदींसह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोणतेही गणेश मंडळ परवानगीसाठी वाट पाहणार नाही. मंडळे 15 दिवस आधी पोलीस आयुक्तालय व पालिकेकडे अर्ज करतील. त्यानंतर परवानगी देण्याची जबाबदारी प्रशासनाची राहील. महापालिका आणि पोलीस अडवणूक करणार असतील तर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मात्र उत्सव गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होईल. पुणे, मुंबईत डीजेला परवानगी असेल तर नाशिकला वेगळा न्याय का, असा प्रश्नही शेटे यांनी उपस्थित केला.